ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये – श्रीमंत कोकाटे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपण खेड्यातून आलो, आपण गरीब आहोत हे न्यूनगंड मनातून दूर करा. खरी गुणवत्ता ही खेड्यात आढळून येते. भारत शिक्षण प्रसारक मंडळ या सारखी संस्था या गुणवत्तेचा सतत शोध घेते असे मत इतिहासकार व लेखक श्रीमंत कोकाटे यांनी जेऊर येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात व्यक्त केले.
जेऊर ता. करमाळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे ४८ वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यानिमित्त इतिहासकार व लेखक श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत आणि दीप प्रज्वलन करुन झाले.अध्यक्ष स्थानी प्रसिध्द उद्योगपती नारायण आमरुळे होते तर व्यासपीठावर माजी आमदार नारायण पाटील यांचेसह संस्थेचे सर्व सदस्य, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष संजयकुमार दोशी, सचिव प्रा अर्जुनराव सरक, संचालक विलास पाथ्रूडकर, माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे, सुनील बादल, सुनील तळेकर, ग्रा. प. सदस्य योगेश कर्णवर, माजी प्राचार्य हनुमंत धालगडे,भारत हायस्कूल ज्यू कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, भारत महाविद्यालय प्राचार्य डॉ अनंतराव शिंगाडे, भारत प्रायमरी मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, ग्रामपंचायतीचे सर्व नूतन सदस्य तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांचे सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी अधिक बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, आताची लढाई ही ज्ञानाची आहे, जगाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक परीक्षेत विक्रमी गुण मिळवण्याचा प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देईल तसेच अंधश्रद्धा आणि जुनाट रूढी परंपरेवर त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा गत सालच्या अहवालाचे वाचन संस्थेचे मानद सचिव प्रा अर्जुनराव सरक यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण शेठ आमरुळे आणि व्याख्याते यांचा परिचय प्राचार्य केशव दहिभाते यांनी केला. सूत्रसंचालन अंगद पठाडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक दीपक व्यवहारे आणि उप प्राचार्य एन. डी. कांबळे यांनी मानले.