विलेपार्लेतील मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ करमाळा शहरात सकल जैन समाजाचा मूक मोर्चा -

विलेपार्लेतील मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ करमाळा शहरात सकल जैन समाजाचा मूक मोर्चा

0

करमाळा (दि.२५) – मुंबई-विलेपार्ले येथील भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पोलीस बंदोबस्तात पाडल्याच्या निषेधार्थ करमाळा शहर व तालुक्यातील सकल जैन समाजाच्या वतीने आज मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसील कार्यालयावर निवेदन देत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच पाडलेले मंदिर राज्य शासनाच्या खर्चातून पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

दि. १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:१५ वाजता विलेपार्ले पूर्व कांबलवाडी परिसरातील ३० वर्ष जुने भगवान पार्श्वनाथ जैन मंदिर अचानक पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान मंदिरातील जिनवाणी व भगवंतांच्या मूर्तींचा अनादर झाल्याचे जैन समाजाचे म्हणणे आहे. यामुळे संपूर्ण देशभरात जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात जैन साधू-मुनिंना भारतात विहार करत असताना पुरेशी सुरक्षा मिळावी, अशी मागणीही करण्यात आली. मध्य प्रदेशात जैन साधूंवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आणि पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधही या वेळी करण्यात आला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून, दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

हा मूक मोर्चा शांततेत पार पडला असून यामध्ये करमाळा शहरासह जेऊर, केम, जिंती येथून आलेले स्त्री-पुरुष व लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!