..तर संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा मार्ग बदलू..
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या परतीच्या मार्गावरील करमाळा तालुक्यातील रस्ता खराब असल्याने हा रस्ता पुढच्या वर्षी पर्यंत दुरुस्त केला नाहीतर आम्ही पालखीचा मार्ग बदलू असा इशारा संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीतील एका महाराजांनी दिला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही त्रंबकेश्वर वरून निघते. ही पालखी करमाळा तालुक्यामधून जाताना रावगाव-करमाळा-जेऊर-शेलगाव (वांगी)-कंदर अशा मार्गे पंढरपूरला जाते व परतीच्या मार्गावरून निमगाव (टें) – केम-मलवडी-निंभोरे-कोंढेज-झरे-देवळाली-करमाळा- जातेगाव अशा मार्गाने प्रवास करते.
निमगाव (टे) -केम- निंभोरे-कोंढेज या दरम्यानचा रस्ता अनेक ठिकाणी खराब असल्याने वारकऱ्यांना चालणे मुश्कील होते. अशाच प्रकारे सातोली ते दहिवली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता कच्चा आहे, खडी उघडी पडली आहे. पाऊस पडल्यानंतर वारकऱ्यांना,पालखीच्या बैलांना पालखी घेऊन चालणे कठीण होते. या रस्त्यावरून चालताना वारकऱ्यांच्या पायाला वेदना होतात,पाय मुरगळतात वारकऱ्यांचे गुडगे, दुखतात त्यामुळे पालखी मार्ग होऊन चांगला रस्ता होणे गरजेचे आहे. आषाढी वारीसाठी मराठवाडा, खानदेश, विदर्भातून करमाळा, गुळसडी, वरकटणे, निंभोरे, वडशिवणे, सातोली, दहिवली, कन्हेरगाव,वेणेगाव (हायवे) या मार्गे सुमारे २५० ते ३०० दिंडया जात असतात ज्यात सुमारे दोन लाख वारकरी असतात.
आषाढी वारीला जाताना काय त्रास झाला नाही परंतु परतीच्या मार्गावर निमगाव ते केम हा रस्ता अतिशय खराब आहे त्यामुळे वारकऱ्याना चालताना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. तसेच रथाची बैल मेटाकुटिला आली होती. शासन तर म्हणतय सर्व पालखी मार्गाचे रस्ते करणार आज आम्ही या मार्गावर परतीच्या प्रवासाला किती वर्ष झाल तरी हा रस्ता आहे तसाच आहे. या भागाचे आमदार साहेबांनी पुढच्या वर्षी पर्यत हा मार्ग करावा अशी सद्बुद्धी निवृत्ती नाथांनी दयावी असा टोला संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीतील ह.भ.प. गोसावी महाराज यांनी केम (ता.करमाळा) येथे परतीच्या मार्गावर मुक्काम असताना आपल्या कीर्तनातून लगावला.
आषाढी वारीसाठी पंढरपूरला, जाणाऱ्या दिंडयासाठी करमाळा-गुळसडी-सरपडोह- वरकटणे-निंभोरे-वडशिवणे-सातोली-दहिवली-कन्हेरगाव- वेणेगाव (हायवे) हा परंपरागत जुना पालखी मार्ग घोषित करावा अशी वारकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी असून ती अद्याप प्रलंबित आहे.
२०२१ मध्ये आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी वाहतूक आणि रस्ते मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करमाळा-गुळसडी-सरपडोह- वरकटणे-निंभोरे-वडशिवणे-सातोली-दहिवली-कन्हेरगाव- वेणेगाव (हायवे) या मार्गासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी निवेदनाद्वारे केली होती परंतु निधीची तरतूद झाली नसल्याने रस्त्याची स्थिती काही सुधारली नाही.
या पालखी मार्गावर निंभोरे हे गाव आहे. या गावात थ़ोर संत शांतामाई यांची समाधी आहे. या संत शांतामाई अंध असूनहि संपूर्ण ज्ञानेश्वरी, हरिपाठ पाठ होते त्या संत म्हणून मराठवाडा, खानदेश, विदर्भात प्रसिद्ध होत्या पंढरपूरला जाणारे सर्व वारकरी प्रथम समाधीचे दर्शन घेतात व पुढे प्रस्थान करतात.
संपादन – सूरज हिरडे
केम येथे निवृत्तीनाथांच्या पालखीचे तोफांची सलामी देऊन स्वागत
करमाळा-निंभोरे-दहिवली-वेनेगाव दरम्यान पालखी मार्ग घोषित करावा – वारकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी