वाटणी मागितल्याच्या कारणावरून वडील व भावाकडून मुलास मारहाण
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जमीन वाटून मागतोय काय.. असे म्हणत भाऊ व वडिलांनी काठीने मुलास मारहाण केली आहे. हा प्रकार अर्जुननगर (ता. करमाळा) येथे २१ मार्चला रात्री सात वाजता घडला आहे. या प्रकरणी अशोक नवनाथ धुमाळ ( रा. अर्जुननगर) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की २१ मार्चला सायंकाळी सात वाजता मी माझ्या घरी असताना भाऊ विजय नवनाथ धुमाळ वडील सोमनाथ भागवत धुमाळ हे घरी आले व मला घराच्या बाहेर बोलावून घेतले. तुला लय माज आलाय काय ? तु जमीन वाटून मागतोय काय ? असे म्हणून विजय याने काठीने माझ्या पाठीत, हातावर, दंडावर मारहाण केली. वडिलांनी शिव्या देऊन जमीन वाटप करून देणार नाही.. असे सांगितले तर माझी पत्नी स्वाती ही भांडण सोडविण्यास आली असता, तिलाही माझ्या भावाने काठीने मारहाण केली आहे. मेहुणा चंद्रकांत काळे हा भांडण सोडविण्यास आला असता, त्याच्या मोटारसायकलवर काठी मारून नुकसान केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माहुरकर हे करत आहेत.