लोकसभेला परत उभे राहा - करमाळा, माढ्यातून आमचे सहकार्य राहील - संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

लोकसभेला परत उभे राहा – करमाळा, माढ्यातून आमचे सहकार्य राहील – संजयमामा शिंदे


केम (प्रतिनिधी/संजय जाधव) :  येत्या लोकसभेच्या निवडणूकीला माढा लोकसभा मतदारसंघातुन तुम्ही परत उभे राहा, करमाळा, माढा तालुक्यातून तुम्हाला आमचे सहकार्य राहिल अशी ग्वाही करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केम येथील रेल्वेच्या कार्यक्रमामध्ये रविवारी (दि. २७ ऑगस्ट)  व्यक्त केले. कन्याकुमारी-पुणे (गाडी क्रमांक 16382) या गाडीला केम रेल्वे स्थानकावर नुकताच थांबा मिळाला आहे. या गाडीला हिरवा झेंडा दाखविण्याच्या निमित्ताने रेल्वे विभागाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

जेऊर येथे कोणार्क एक्स्प्रेस (गाडी क्रमांक ११०२०) तर केम येथे कन्याकुमारी-पुणे (गाडी क्रमांक १६३८२), माढा येथे मुंबई-सोलापूर सिध्देश्वर एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२११६) या गाड्यांना नुकताच नव्याने थांबा मिळालेला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत तिन्ही रेल्वे स्थानकावर या गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. केम येथे आमदार संजय मामा शिंदे व खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.

मागच्या महिन्यात २९ जुलैला माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, येत्या लोकसभा निवडणुकीला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून २ लाखांचे मताधिक्य देऊ. त्यानंतर आता त्यांचे बंधू करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे यांनी देखील सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याने खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर हेच माढा लोकसभा मतदार संघासाठी पुन्हा एकदा प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येत आहे.

या विविध ठिकाणच्या कार्यक्रमासाठी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री महेश चिवटे, ADRM परीहर , करमाळा पोलीस स्टेशनचे PI गुंजवटे, करमाळा भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, माढा भाजप तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, शंभूराजे जगताप, केमचे माजी सरपंच अजित तळेकर, केमचे ज्येष्ठ नेते दिलीपदादा तळेकर, अतुल पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ.सुराणा, सुहास सूर्यवंशी,  करमाळा भाजप शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,कुर्डुवाडी भाजपाचे अध्यक्ष उमेश पाटील, सुरेश अंबुरे, जयसिंग ढवळे, राजाभाऊ चवरे आदीजन उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदार संघातील  जेऊर,केम,माढा येथे तीन एक्स्प्रेस गाडयाना थांबा मिळवून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. अजूनही करमाळा तालुक्यातील रस्त्याचे प्रश्न, रेल्वे क्रॉसिंग यांच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावेत. आम्ही वेगवेगळ्या पक्षात जरी असलो तरी विकासाच्या कामात आजपर्यंत खासदार नाईक निंबाळकर यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य लाभले आहे. त्यामुळे दिलीपदादा तळेकर, अजित दादा तळेकर यांच्या साक्षीने मी तुम्हाला येत्या निवडणूकीत करमाळा, माढा तालुक्यातुन सहकार्य करू असे आश्वासन देतो.

या वेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले आमदार संजय मामा शिंदे यांची व माझी पहिलीच मैत्री आहे. करमाळा,माढा तालुक्याच्या विकासासाठी मामाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. केम या ठिकाणी रेल्वे जंक्शन साठी प्रयत्न करणार आहे. जेऊर स्थानकावरील हुतात्मा एक्स्प्रेस व इतर गाड्यांच्या थांब्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिंती पारेवाडी येथे देखील लवकरच काही गाड्यांना थांबे मिळतील. तसेच आमदार संजय मामा यांनी आपल्याला जाहिर पाठिंबा दिल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे.

संपादन : सुरज हिरडे

Related Newsकन्याकुमारी-पुणे एक्स्प्रेसचे केम येथे जल्लोषात स्वागत – गाडी चालकांचा केला सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!