शेटफळच्या 'नागनाथ लेझीम' संघाला राज्यस्तरीय सन्मान -

शेटफळच्या ‘नागनाथ लेझीम’ संघाला राज्यस्तरीय सन्मान

0

चिखलठाण (बातमीदार) शेटफळ (ता. करमाळा) येथील नागनाथ लेझीम संघाला राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालयात छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. या वेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे वंशज शिवाजीराजे जाधवराजे, तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालदादा मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचे वंशज राहुलदादा राजेमोहिते तसेच नितीनराजे भोसले अशा वीरवंशज मान्यवरांच्या हस्ते लेझीम संघातील सदस्यांना पुरस्कार देण्यात आला.

शेटफळ गावातील या लेझीम संघामध्ये तब्बल २०० सदस्यांचा सहभाग असून, संघाने शिवजयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, गणेशोत्सव तसेच रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात नेहमीच आपली उपस्थिती दर्शविली आहे. याचबरोबर या संघातील तरुण रायगडावर होणाऱ्या सोहळ्यात दोन दिवस स्वयंसेवक म्हणून कार्य करतात व किल्ल्याची स्वच्छता करण्याचे महत्त्वाचे काम हाताळतात.

संघाच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. संघाचे सदस्य गणेश मोरे, सुहास पोळ, नवनाथ पोळ, विशाल पोळ, अमोल पोळ आणि भैय्यासाहेब पोळ यांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!