दर घसरल्याने केळी उत्पादक अडचणीत – MSP, हमी खरेदी व नुकसानभरपाईसाठी रश्मी बागल यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

करमाळा:सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मिळत असलेला अत्यल्प दर आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे तीव्र आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या रश्मी बागल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या समस्या आणि बाजारातील घसरणीबाबत सविस्तर माहिती दिली. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दर स्थिरता, हमी खरेदी आणि नुकसानभरपाईसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

उजनी परिसर हे राज्यातील प्रमुख केळी उत्पादक क्षेत्र असून सध्या खोडवा केळीला फक्त ₹२.५० प्रति किलो आणि निर्यातक्षम केळीला ₹१० प्रति किलो इतका निच्चांकी दर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हा दर २४ ते २६ रुपये किलो होता. अचानक झालेल्या या घसरणीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत.
दिवाळीनंतर एजंट, व्यापारी आणि काही निर्यातदार कंपन्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. “शिप नाही”, “मागणी कमी” अशा कारणांवरून दर घटवले जात असले तरी कमी दरात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांकडून तात्काळ माल उचलला गेला, हे संगनमताचे स्पष्ट उदाहरण असल्याचे बागल यांच्या निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय, बिगरमोसमी पाऊस, वादळी वारे आणि बुरशीजन्य रोगामुळे निर्यातक्षम मालावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारातही तोटा सहन करावा लागत आहे.

रश्मी बागल यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या प्रमुख मागण्या :
- केळी पिकासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) तातडीने जाहीर करावी.
- निर्यातदार कंपन्यांनी दररोजचे खरेदी दर संकेतस्थळावर सार्वजनिकरित्या जाहीर करणे बंधनकारक करावे.
- पणन विभागामार्फत खरेदी-विक्री व्यवहारांवर नियंत्रण आणावे.
- सर्व खरेदीदारांसाठी पणन विभागाचा परवाना अनिवार्य करावा.
- केळी खरेदी केल्यानंतर अधिकृत पावती देणे बंधनकारक करावे.
- निर्यात बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाल्यास शासनाने हमी खरेदी योजना लागू करावी.
- अवकाळी पावसामुळे बाधित केळी बागांचे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी.


