चोरटे सक्रिय, तपास निष्क्रिय; पशुपालकांच्या चिंतेत भर

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरांच्या चोरीचे प्रकार वाढले असून, त्यांचा तपास होत नसल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. पशुधन चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसभर शेतात काम करून रात्री शेळ्या-मेंढ्यांची राखण करण्याची वेळ आली आहे.

अनेक ठिकाणी बिबट्याच्या अफवा असतानाच चोरीचे प्रकार घडत असून, झालेल्या चोरीचा तपास व्हावा अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे. मात्र चोरीनंतरही तपास होत नसल्याने अनेक पशुपालक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी चोरट्यांचे फावते आणि दिलेल्या तक्रारींचाही तपास न झाल्याने चोरट्यांना अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याचे चित्र आहे.
पाथुर्डी गावात चार महिन्यांपूर्वी झालेल्या शेळी चोरीच्या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. विशेष म्हणजे ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असतानाही करमाळा पोलिसांना चोरट्यांना अटक करण्यात अपयश आले आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसत असून चोरट्यांचे चेहरेही कैद झाले आहेत. त्यामुळे तपास लवकर पूर्ण होईल, अशी अपेक्षा तक्रारदार शितलकुमार मोटे (पाथूर्डी, तालुका करमाळा) यांनी व्यक्त केली होती. मात्र चार महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“गुन्हा दाखल असूनही आणि सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसत असतानाही त्यांना अटक का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या गुन्ह्याचा तपास तातडीने पूर्ण करून चोरट्यांना अटक करावी तसेच चोरीस गेलेल्या शेळ्या परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी शितलकुमार मोटे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.


