आवाटी येथे सीना नदीतून चोरीची वाळू पकडली – ६ लाख ६० हजाराचा ऐवज जप्त..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : आवाटी येथील सीना नदीतून वाळू चोरी करून घेऊन जात असताना, एका तरूणास पोलीसांनी मुद्देमालासह पकडले असून त्याच्याकडून ट्रॅक्टर ट्रॉलीसह ६ लाख ६० हजाराचा ऐवज जप्त केला आहे. हा प्रकार १३ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजता घडला आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक प्रदीप बबन चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आवाटी येथून सीना नदीतून वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावर मी तसेच हवालदार डोंगरे, श्री.भराटे, पोलीस नाईक कावळे असे आम्ही खासगी वाहनाने आवाटीकडे गेलो असताना सीना नदीच्या पात्रात चैतन्य पांडूरंग शेळके (रा. धोत्रा, ता. परांडा ) हा त्याच्या सोनालिका कंपनीच्या ट्रॅक्टरमध्ये नदीतील वाळू बेकायदेशीररित्या भरत असताना आढळून आला.
त्याच्याकडे कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे त्याने सदरची वाळू चोरली असल्याचे स्पष्ट झाले. तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाचाही भंग केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.