दाखला-मार्कलिस्टसाठी बेकायदेशीर वसुली थांबवा – शिक्षणाधिकाऱ्यांचा इशारा

केम(संजय जाधव) : सोलापूर जिल्ह्यातील काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका (मार्कलिस्ट) देताना बेकायदेशीरपणे ठराविक रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सोलापूरचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना बेकायदेशीर वसुली करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट आदेश लेखी स्वरूपात काढला आहे.

या संदर्भात स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक व इतरांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे लेखी तक्रार सादर करत तात्काळ कारवाईची मागणी केली होती.
या निवेदनाची त्वरित दखल घेत आदेश काढला आहे. या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व गुणपत्रिका देताना कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर रक्कम अथवा फी वसूल करू नये. अशी तक्रार या कार्यालयास प्राप्त झाल्यास महाराष्ट्र शैक्षणिक संस्था नियम १९७७ च्या अनुक्रमांक २ नुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.”

हा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांना पाठवण्यात आला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील अनावश्यक आर्थिक बोजा कमी होणार असून शिक्षण व्यवस्थेतील शिस्त व पारदर्शकता टिकवण्यास हातभार लागणार आहे.






