स्व.काकासाहेब थोबडे चषकात करमाळा वकील संघाची दमदार कामगिरी

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर येथे उत्साहात सुरू असलेल्या स्व. काकासाहेब थोबडे चषक क्रिकेट स्पर्धेत करमाळा वकील संघाने अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध खेळ सादर करत उपविजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत करमाळा संघाने प्रत्येक सामना चुरशीने खेळत प्रेक्षकांची मने जिंकली असून संघाच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल करमाळा वकील संघाला उपविजेतेपदाचा मान मिळाला. तसेच संघातील खेळाडूंनी वैयक्तिक पुरस्कारांवरही आपली मोहोर उमटवली. ॲड. विश्वजित बागल यांना बेस्ट बॉलर तसेच मॅन ऑफ द सिरीज (मॅन ऑफ द मॅच सिरीज) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर ॲड. माऊली टापरे यांनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मिळाल्या.

या स्पर्धेत करमाळा वकील संघातील सर्व खेळाडूंनी संघभावना जपत उल्लेखनीय योगदान दिले. संघामध्ये ॲड. अमर शिंगाडे, ॲड. शिवराज शेरे, ॲड. अजित विघ्ने, ॲड. निखिल पाटील, ॲड. विश्वजित बागल, ॲड. माऊली टापरे, ॲड. स्वप्नील यादव, ॲड. ओंकार मुसळे, ॲड. किरण वीर, ॲड. विशाल घोलप, ॲड. प्रियाल आगरवाल, ॲड. मनोज कांबळे, श्री. शशिकांत शेजुळ, अमोल राऊत यांचा समावेश होता. संघाचे मार्गदर्शक म्हणून ॲड. सुहास मोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सामन्यांदरम्यान विशेषतः बॉलिंग विभागात ॲड. विशाल घोलप, ॲड. अमर शिंगाडे, ॲड. शिवराज शेरे आणि ॲड. विश्वजित बागल यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. संघाच्या खेळीमेळीच्या वातावरणात खेळल्या गेलेल्या या सामन्यांनी स्पर्धेला वेगळीच रंगत आणली.

अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ॲड. मिलिंदजी थोबडे, ॲड. भारत कट्टे, ॲड. उमेश मराठे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव, ॲड. आळंगे, ॲड. चिंचोळकर मॅडम, ॲड. देशमुख मॅडम तसेच स्पर्धेचे आयोजक ॲड. रितेश थोबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. करमाळा वकील संघाच्या या यशाबद्दल करमाळा संघाचे पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातील स्पर्धांसाठी संघाला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

