तळेकर विद्यालयात विद्यार्थ्यांना धनुर्विद्या आणि कुस्तीचे धडे

केम (संजय जाधव) : ‘खेळामुळे मन समृद्ध आणि शरीर सुदृढ बनते’ या विचाराला पुढे नेत, केम येथील श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर व राजाभाऊ तळेकर विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांसाठी मॅटवरील कुस्ती आणि आर्चरी (धनुर्विद्या) यांचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मा. श्री दिलीप तळेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री महेश तळेकर, सचिव व राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनोद (मनोज) तळेकर, श्री शिवाजी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री नागनाथ तळेकर, महावीर तळेकर, मदन तळेकर, वसंत तळेकर तसेच पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


धनुर्विद्येमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी ठरलेले प्रशिक्षक श्री सागर ताकतोडे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून कुस्तीचे विनामूल्य प्रशिक्षण मा. पै. मदन तळेकर यांच्या पुढाकाराने दिले जात आहे. त्यांनी या उपक्रमात सकारात्मक सहभाग दर्शवून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कुमारी राधा तळेकर व सान्वी म्हेत्रे या विद्यार्थिनींनी कुस्तीतील चित्तथरारक कौशल्याचे दर्शन घडवले. विजेत्या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक व महावीर (आबा) तळेकर यांच्यावतीने प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

त्याचप्रमाणे आर्चरीत राष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी अचूक नेमबाजी करत उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही मोठी प्रेरणा मिळाली. प्रशिक्षक श्री सागर ताकतोडे यांनी आर्चरी या खेळाविषयी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शाळेचा हिरवागार परिसर, भव्य क्रीडांगण, उत्कृष्ट नियोजन आणि कार्यक्षम व्यवस्थेमुळे उपस्थित मान्यवर, पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील अधिकारी घडवण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिकारी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.


