कोर्टी जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली फुलवली परसबाग
करमाळा (दि.९) – शासनाने प्रत्येक शाळेत सेंद्रिय पद्धतीने परसबाग तयार करून त्याद्वारे पिकविलेल्या सेंद्रिय भाजीपाल्याचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करण्याच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे काही शाळांनी पालन करून परसबागेचा उपक्रम आपापल्या शाळेत राबविलेला आहे. असाच उपक्रम करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेमध्ये सुरू आहे.
या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक संतोष महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शाळेच्या परसबागेत विविध प्रकारच्या सेंद्रिय भाजीपाला लागवड केली आहे. या भाजीपाल्याचा उपयोग शाळा रोजच्या शालेय पोषण आहारात करत आहे. यात कोणत्याही रासायनिक खतांचा वापर अथवा औषध फवारणी केली जात नाही.
या उपक्रमाविषयी माहिती देताना शिक्षक संतोष महाडिक म्हणाले की, एक गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही ही परसबाग तयार केलेली आहे. २०१९ पासून हा उपक्रम आम्ही शाळेत राबवित आहोत. सुरुवातीला निवडलेल्या जागेत काळी माती आणून टाकली. त्यावर शेणखत आणून टाकले. जागेला कंपाउंड बांधले.
या परसबागेतून दरवर्षी आम्ही विविध फळभाज्या व पालेभाज्या घेतो. यात वांगी, कोथिंबीर, मेथी, टोमॅटो, कोबी, मिरच्या, घेवडा, भोपळा, दोडका आदींचा समावेश आहे. या भाज्यांची लागवड करताना शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जातो, शिक्षक देखील आवडीने सहभाग घेतात.
या आमच्या परसबागेतून पिकवलेल्या सर्व भाजीपाल्याचा आम्ही शालेय पोषण आहार योजनेमध्ये वापर करतो.
या परसबागेची सुरुवात करताना कोर्टी येथील माजी कृषी अधिकारी निळकंठ अभंग यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेच त्याबरोबर आर्थिक सहाय्य देखील केले. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मध्यंतरी शाळेला भेट दिली त्यावेळी त्यांनी ही परसबाग पाहून आमचे कौतुक केले.
परसबाग हा उपक्रम सुरू करण्यापेक्षा त्याचं संवर्धन करणे खूप अवघड आहे. त्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. भास्कर शितोळे यांच्या माध्यमातून आम्ही या परसबागेला ठिबक सिंचन करून घेतले आहे. त्यामुळे पाण्याची अडचण येत नाही. उन्हाळ्यात शक्यतो पिके घेत नाही आणि शाळेलाही सुट्टी असते.
आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. नव्या पिढीची नाळ शेतीशी जुळली पाहिजे त्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. तसेच आपण जे रोज अन्न खातो ते पिकविण्यामागे शेतकऱ्यांचे काय कष्ट असतात या गोष्टी विद्यार्थ्यांना लहान वयातच समजाव्यात त्यासाठी परसबाग हा उपक्रम प्रत्येक शाळेने राबविला पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतः लागवड केलेला भाजीपाला जेव्हा पिकून येतो तेव्हा त्यांना आपण केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याचा आनंद मिळतो.
– संतोष महाडिक, शिक्षक, कोर्टी जिल्हा परिषद शाळा
या सर्व उपक्रमांमध्ये मुख्याध्यापक विशाल शहाणे, शिक्षिका प्रियंका ढाळे, दिपाली साळुंखे या शिक्षकांचे तसेच शाळेचे कर्मचारी गहूबाई बुधवते आदी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. याबरोबरच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीमंत झाकणे व सदस्यांचे सहकार्य असते.