सरपडोहच्या जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली वाबळेवाडी–जालिंदरनगर आंतरराष्ट्रीय शाळांना भेट

करमाळा:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोह, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी वाबळेवाडी व जालिंदरनगर येथील आंतरराष्ट्रीय शाळांना शैक्षणिक अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट देण्यात आली.

या दौऱ्यात शाळांची कार्यपद्धती, आधुनिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी उपस्थित शिक्षक व ग्रामस्थांना प्रेरणादायी सूचना देत शाळेच्या प्रगतीसाठी उपयुक्त दिशा दाखवली.

या अभ्यास दौऱ्यादरम्यान सरपडोह येथील दत्तात्रय खराडे यांनी आपल्या निवासस्थानी नाश्त्याची व्यवस्था केली, तर सर्पनाथ सेवा मंडळ, सरपडोह यांनी सर्वांसाठी जेवणाची उत्कृष्ट सोय केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल सर्व स्तरांतून आभार व्यक्त करण्यात आले.
हा शैक्षणिक अभ्यास दौरा यशस्वी ठरला असून वाबळेवाडीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोह अधिक गुणवत्तापूर्ण, आधुनिक व आदर्श बनवण्याचा निर्धार ग्रामस्थ, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाने व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर (कनेरसर, ता. खेड) आणि वाबळेवाडी (ता. शिरूर) शाळेत राबविण्यात येणारे नावीन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, तंत्रज्ञानयुक्त शिक्षण, लोकसहभागातून शाळांचा विकास याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. या गोष्टी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आहेत, त्यामुळे या शैक्षणिक पॅटर्नची राज्यभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळा ही ‘टी ४’ जागतिक संस्थेने केलेल्या ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन’ स्पर्धेमध्ये जगभरातील समुदायाने पसंती क्रमानुसार केलेल्या मतदानानुसार सर्वाधिक मते मिळवून ‘कम्युनिटी चॉइस ॲवॉर्ड’ या मानाच्या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

