यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मुंबई विधानभवन येथे ‘अभ्यास दौरा’ संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांची ‘ महाराष्ट्र विधानभवन, मुंबई’ येथे गुरुवार, २७ एप्रिल रोजी एकदिवसीय अभ्यास दौरा पार पडला, या अभ्यास दौऱ्यात ३४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
लोकशाहीची मूल्य विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवताना प्रत्यक्ष राज्यकारभार कसा चालतो याचा अनुभव विद्यार्थ्यांना येण्यासाठी या विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विधानभवनातील कार्याचे अवलोकन केले. विधानभवनातील अधिकारी श्री.चौगुले यांनी विधानसभेच्या कामकाजाची माहिती दिली व मार्गदर्शन केले तसेच प्रवीण देवरे यांनी विधानसभा सभागृह, विधान परिषद सभागृह व सेंट्रल हॉल दाखवला.
विधानभवन परिसरात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट झाली व त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. तसेच विधानभवन ग्रंथालय प्रमुख निलेश वडणेरकर व कक्ष अधिकारी जयंत सोडे यांनी विधानभवन ग्रंथालय दाखविले व विद्यार्थ्यांना माहिती दिली. याचबरोबर विद्यार्थ्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय व गेट वे ऑफ इंडिया आदि ठिकाणांना भेटी दिल्या.
ही सहल यशस्वी करण्यासाठी राज्यशास्त्र विभागाचे प्रा. अभिजीत लोंढे, प्रा. कमलेश महाडीक, प्रा. महेश जगताप, अनिता साठे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.