ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे आहे त्यांनी मोबाईलच्या वापरावर मर्यादा ठेवा – करे पाटील
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मोबाईलच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम समोर येऊ लागले असून ज्या विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे आहे त्यांनी मोबाईलच्या वापरावर मर्यादा ठेवल्या पाहिजेत असे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी कुंभेज (ता.करमाळा) येथे येथील दिगंबराव बागल माध्यमिक विद्यालयात करिअर मार्गदर्शन व भारतीय सैन्य दलातील जवान सचिन पवार यांच्या सेवापुर्ती निमित्त सन्मान व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करिअर विषयी संधी या विषयावर बोलताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हनुमंत पाटील होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, नोकरी आणि करिअर यामध्ये फरक असून विद्यार्थ्यांनी नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करण्यापेक्षा चांगले करिअर घडण्यासाठी परिश्रम पुर्वक अभ्यास करण्याची गरज आहे. अभ्यासामध्ये व्यत्यय आणणाऱ्या मोबाईल सारख्या गोष्टींच्या वापरावर मर्यादा ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.
सेवापूर्ती सन्मानात उत्तर देताना जवान सचिन पवार यांनी सेवा काळात अनुभवलेल्या चित्त थरारक प्रसंगाचे वर्णन करून बावीस वर्ष वर्दी अंगावर घालून देशाची सेवा केली पुढील काळात अंगावर वर्दी नसेल परंतु ते सेवा कायम करत राहणार असल्याचे सांगितले. विद्यालयातील शिक्षकांच्या वतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर ते शिकल्याने सेवाभावी संस्थेच्या वतीने डिजिटल शाळा उपक्रमासाठी स्मार्ट टीव्ही विद्यालयास प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विष्णु शिंदे यांनी केले तर आभार कल्याणराव साळुंके यांनी मानले. यावेळी पोलीस दलातील निर्भया पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, अक्कलकोट देवस्थान चे विश्वस्त भारतराव शिंदे, इंग्लिश टीचर असोसिएशनचे बाळकृष्ण लावंड, महावीर साळुंके, गणेश कादगे, अण्णासाहेब साळुंके, बिभिषण कान्हेरे, मेजर मुटके, जयेश पवार यांच्यासह या परिसरातील ग्रामस्थ पालक बहुसंख्येने उपस्थित होते.