करमाळ्यात 22 जानेवारीला ‘राम’मंदिरात प्रतिष्ठापना होणार – ‘सुभाष’चौकाचे नामांतर ‘श्रीराम’ चौक करणार…
करमाळा / संदेश प्रतिनिधी : : २२ जानेवारीला आयोध्येत प्रभु श्रीराम म्हणजेच रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे. हे निमित्त साधून करमाळा येथील श्रीराम मंदिर ट्रस्ट, श्रीरामनवमी उत्सव समिती यांचे वतीने वेताळपेठ येथील नव्याने बांधलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. तर श्रीराम चौकात विश्वशांती श्रीराम महायज्ञ तसेच श्रीराम अभिषेक व श्रीराम महाआरती असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
श्रीराम ट्रस्ट वेताळपेठ यांचे माध्यमातून २१ जानेवारीला रविवारी सायंकाळी चार वाजता खोलेश्वर मंदिरापासून श्री रामाची भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता मंदिर वास्तुशांती करण्यात येणार असून ८ वाजता महायज्ञ व अभिषेक तर ११ वाजता श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापना व श्रीराम आरतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी १२.३० ते ४.०० पर्यंत मंदिरामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
करमाळा शहरातील ‘सुभाष चौका’चे याच दिवशी श्रीराम चौक असे नामकरण केले जाणार आहे. याच श्रीराम चौकात श्रीरामनवमी उत्सव समिती तर्फे सकाळी ८.३० ते १० या कालावधीत सर्व समाजातील २१ जोडप्याच्या शुभहस्ते विश्वशांती श्रीराम महायज्ञ होणार आहे. त्यानंतर १०१ श्रीराम भक्तांच्या हस्ते श्रीराम अभिषेक तर १२.०० वाजता कारसेवकांच्या हस्ते श्रीराम महाआरती आयोजित केली आहे. दुपारी ४ ते ५ या कालावधीत दुर्गावाहिनी यांचेकडून साहसी खेळाचे प्रदर्शन तर सायंकाळी ५.३० ते १० या कालावधीत प्रसिध्द गीतकार उषा तुलासियान यांच्यासह श्रीराम चौकी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रात्री १० वाजता फटाक्यांची आताषबाजी करून आनंद व्यक्त केला जाणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे; असे आवाहन संयोजन समिती तर्फे करण्यात आले आहे.