माहिती अधिकार दिन रविवारऐवजी सोमवारी साजरा करण्याबाबत विविध शासकीय कार्यालयांना निवेदन

करमाळा : आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, यंदा २८ सप्टेंबर २०२५ रोजी रविवार असल्याने माहिती अधिकार दिन सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करण्यासाठी करमाळा तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेच्या वतीने विविध शासकीय कार्यालयांना निवेदन देण्यात आले.

शुक्रवारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका भूमिअभिलेख अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच महावितरणचे उपअभियंता यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी तो दिवस रविवारी येत असल्याने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १२ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार माहिती अधिकार दिन सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा करावा. सर्व शासकीय कार्यालयांनी या सूचनेचे पालन करून विविध उपक्रमांतून माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.

या वेळी करमाळा तालुका अध्यक्ष विशाल परदेशी, तालुका उपाध्यक्ष दिलीप क्षीरसागर, शहराध्यक्ष आझाद शेख, तालुका संघटक फारुक जमादार, उपसंघटक देविदास साळुंखे, प्रचारक विशाल राठोड, संपर्कप्रमुख अंगद भांडवलकर तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते आयुब शेख उपस्थित होते.




