संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान दरमहा रुपये 1000/- वरून 1500/- रुपये : प्रा.शिवाजीराव बंडगर यांची माहिती..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘महाराष्ट्र राज्य सरकार’ने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अनुदान दरमहा रुपये 1000/- वरून 1500/-रुपये केले असल्याची माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे माजी अध्यक्ष तथा करमाळा बाजार समितीचे सभापती प्रा शिवाजी बंडगर यांनी दिली.
याबाबत श्री. बंडगर यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या गोर गरीब, निराधार, विधवा , परीतक्ता महिला,व्रद्ध आदि जणांना दरमहा 1000/- इतके मिळत आहे. या अनुदानात वाढ करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती. आपण अध्यक्ष असताना आम्ही ही अनेकदा सरकारकडे केली होती.
याचा सारासार विचार करून शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात या बाबत निर्णय केला होता. परंतु अध्याप अंमलबजावणी केलेली नव्हती, नुकत्याच 5 जुलै रोजी अंमलबजावणी बाबतचा शासनादेश जारी केला असून जुलै 2023 पासून याची सुरूवात करण्यात येणार आहे.
याबाबत पुढे बंडगर पुढे म्हणाले की , संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत येणाऱ्या सर्व योजना म्हणजे संजय गांधी, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना आदि सर्व योजनासाठी देखील ही 500 रुपयाची वाढ आहे. करमाळा तालुक्यातील सुमारे 9 हजार लाभार्थ्याना याचा लाभ होणार असून, करमाळा तालुक्यात दरमहा आता पूर्वीपेक्षा साडेचार लाख रुपये जादा येणार आहेत.