साखर कारखान्यांनी  दिवाळीपूर्वी थकीत  बिले न दिल्यास 'भीक मागो आंदोलन' करण्याचा ईशारा - Saptahik Sandesh

साखर कारखान्यांनी  दिवाळीपूर्वी थकीत  बिले न दिल्यास ‘भीक मागो आंदोलन’ करण्याचा ईशारा


करमाळा (दि.१२) – करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थकीत ऊस बिले, वाहतूक बिले, कामगारांच्या पगारी दिवाळीपूर्वी अदा न केल्यास २८ ऑक्टोंबर रोजी ‘भीक मागो आंदोलन’ करणार असल्याचा इशारा दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी दिला असून अशा प्रकारचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना प्रत्यक्ष भेटून प्रा.रामदास झोळ, शेतकरी कामगार ‌संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, प्रा. राजेश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील ,भीमराव ननवरे, बापू गायकवाड, संजय जगताप यांनी निवेदन दिले आहे.

निवेदनात असे म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सह. साखर कारखाना, श्री मकाई सह. साखर कारखाना, श्री. भैरवनाथ शुगर लि. विहाळ, श्री. गोविंदपर्व गुळ कारखाना राजूरी, श्री. कमलाई शुगर अशा पाचही कारखान्यांनी ऊस उत्पादकांची बिले अद्याप दिलेली नाहीत.

याबाबत शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये बिले न मिळाल्यामुळे असंतोष पसरला आहे. सध्या सणा-सुदीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे. त्यामुळे कारखान्यांनी दिवाळीपूर्व जर बिले अदा केली नाही, तर शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शेतकऱ्यांचा अंत न पाहता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची ऊस बिले, वाहतूक बिले, तोडणी बिले, कामगारांच्या पगारी इत्यादी देणी कारखान्यांनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा तालुक्यातील सर्व पिडीत शेतकरी व विविध पक्ष, संघटना सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी तहसिल कार्यालय करमाळा व कारखानदारांच्या घरी जाऊन भीक मागो आंदोलन करणार असल्याचे ‌ शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी सांगितले आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील शेतकरी, कामगार, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!