‘सुंदर माझी शाळा’ स्पर्धेत गौंडरेचे धर्मवीर संभाजी विद्यालय जिल्ह्यात प्रथम

केम(संजय जाधव): संत सोपानकाका सुंदर माझी शाळा या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार गौंडरे (ता.करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयाला मिळालेला आहे.

संत सोपानकाका सहकारी बँक, सासवड व सोपानकाका फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्हा पातळीवर ३ क्रमांक व तालुका पातळीवर ३ क्रमांक निवड करण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय निकालात विविध उपक्रम राबवित सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येण्याचा मान करमाळा तालुक्यातील धर्मवीर संभाजी विद्यालय, गौंडरे या शाळेला मिळाला आहे. या निवडीनंतर या शाळेला प्रथम बक्षीस म्हणून दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, पुरंदर हवेली चे मा.आ.संजय जगताप, मुख्याध्यापक संघाचे महाराष्ट्रचे अध्यक्ष तानाजी माने तसेच इतर मान्यवर मंडळी यांच्या हस्ते हा पुरस्कार मुख्याध्यापक बापूसाहेब नीळ यांनी स्वीकारला. यावेळी सचिव हरीदास काळे सर,शकिल भाई तांबोळी, सुखदेव गिलबिले सर, अशोकराव जावळे सर, उत्तम हनपुडे सर, ओंकार नीळ उपस्थित होते.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना मुख्याध्यापक बापूसाहेब नीळ म्हणाले की, शाळेत दर्जेदार शिक्षणावर भर देण्याबरोबरच विविध शाळाबाह्य उपक्रम राबविण्यात आले. ज्यामध्ये कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्त शाळा, स्वच्छतागृह, हँडवॉश, शाळेला रंगरंगोटी, स्वच्छ पाणीपुरवठा, वृक्षारोपण, पक्षी निरीक्षण आदी उपक्रम राबविले.त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाव, विधवा महिला सन्मान अशा अभियानांची जनजागृती देखील शाळेत करण्यात आली आहे.

तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मच्छिंद्र नुस्ते माध्यमिक विद्यालय कविटगाव (ता.करमाळा), द्वितीय क्रमांक महात्मा फुले माध्यमिक विद्यालय मोरवड (ता. करमाळा), तर तृतीय क्रमांक लालबहादूर शास्त्री विद्यालय सालसे (ता. करमाळा) या शाळेच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास तीन हजार रुपये द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये तर तृतीय क्रमांकास एक हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.


