करमाळ्यात येत्या रविवारी सुरताल संगीत व नृत्य महोत्सवाचे आयोजन

करमाळा(दि.२२) : करमाळा येथील सूर ताल संगीत विद्यालयाच्या वतीने रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सूर ताल संगीत नृत्य महोत्सव व पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. करमाळा एसटीस्टॅन्ड समोरील विकी मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम सुरु होईल अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी दिली.

करमाळा तालुक्यात संगीताची परंपरा जपण्यासाठी आणि नवी पिढीपर्यंत संगीत रुजवण्यासाठी सुरताल संगीत विद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संगीताला प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर कलाकारांना येथे आमंत्रित करून त्यांचे कार्यक्रम सादर केले जातात, तसेच विविध पुरस्कारांद्वारे त्यांचा गौरव केला जातो. त्यामुळे तालुक्यातील संगीतप्रेमींसाठी हे विद्यालय एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले आहे.

यंदा सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांना गौरविण्यात येणार आहे. यामध्ये –
- पं. सुदर्शन राजोपाध्याय (नेपाळ – सरोद) यांना सुरताल संगीत शिरोमणी पुरस्कार,
- डॉ. दुमिथा गुणवर्धन (श्रीलंका – कथ्थक) यांना सुरताल नृत्य भूषण पुरस्कार,
- बंदना बरुआ (गुवाहाटी – सत्तरिया) यांना सुरताल नृत्य शिरोमणी पुरस्कार,
- तन्नी चौधरी (कोलकाता – कथ्थक) यांना सुरताल नृत्य कलानिधी पुरस्कार
- डॉ. महेंद्र चंद्रभान नगरे (करमाळा) यांना सुरताल करमाळा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

याचबरोबर या कार्यक्रमांमध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन भक्तिगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. ही स्पर्धा आषाढी एकादशी निमित्त विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ५१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमात पुरस्कार वितरणासोबतच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत रसिकांना रंगतदार संगीत मेजवानी मिळणार असल्याने, जास्तीत जास्त संगीतप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. नरारे यांनी केले आहे.


