सावंत गट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणार – सुनिल सावंत

करमाळा : पारदर्शक व विकासाभिमुख कामांसाठी सावंत गट करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार असल्याची माहिती गटाचे नेते सुनिल सावंत यांनी साप्ताहिक संदेशशी बोलताना दिली.

करमाळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे यंदा सर्व साधारण महिला उमेदवाराला आरक्षित झाले असून हे पद मिळविण्यासाठी विविध गटातून चुरस निर्माण झाली आहे. पालिकेच्या राजकारणात आघाडीतून कायम सत्तेत असलेल्या सावंत गटाने नगराध्यक्ष पदाची तयारी केली आहे. सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांच्या पत्नी चैत्राली सावंत किंवा माजी नगरसेवक संजय सावंत यांच्या पत्नी मोहिनी सावंत या नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीसाठी उभे राहण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना श्री. सावंत म्हणाले की, करमाळा नगरपरिषदेवर गेल्या ७० वर्षांपासून माजी नगराध्यक्ष डी के सावंत, कै, सुभाष आण्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष दादा सावंत, मागील नगरसेवक संजय (पप्पू) सावंत यांनी त्यांच्या काळात स्वच्छ व पारदर्शक कारभार केला नागरिकांच्या मुलभूत गरजा कडे जातीने लक्ष देत पाणी पुरवठा, स्वच्छता याकडे लक्ष दिले तसेच विकास कामांसाठी निधी खेचून आणला. सावंत गटाने आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना नगरपरिषद मध्ये नगरसेवक, नगराध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे,अजीज तांबोळी यांच्या सारख्या सामान्य कुटुंबातील माणसाला संधी दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की,सावंत कुटुंब हे पुर्वी पासुन सेवा भावी कुटुंब आहे छत्रपती शिवाजी महाराज तरूण मंडळाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात अनेक महापुरुषांच्या जयंत्या असो, रक्तदान शिबीर असो, तसेच कोरोना काळात अनेक रुग्णांना धीर दिला मदत केली. करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदारांनी साथ दिली तर आम्ही कोणताही पक्षभेद न करता सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही विकासाभिमुख काम करणार आहे.




 
                       
                      