रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दलित महासंघाचा पाठिंबा – रश्मी बागल यांचेकडून पदाधिकाऱ्यांचे स्वागत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संपूर्ण दलित महासंघाचा पाठिंबा देण्यात आला असून, या पाठींब्याचे पत्र भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांना दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर अवघडे, तालुकाध्यक्ष दिपक आरणे व शहराध्यक्ष वैजनाथ जाधव यांच्या सहीने देण्यात आले.
देशाचा खऱ्या अर्थाने विकास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकतो तसेच भारत देशामध्ये संविधानाप्रमाणे पारदर्शी कामकाज फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो व त्या माध्यमातून गोरगरीब दिन दलित व सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळू शकेल ही भूमिका घेऊनच आम्ही संपूर्ण दलित महासंघाचा पाठिंबा महायुतीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देत असल्याचे दलित महासंघाने पत्रकातद्वारे घोषित केले आहे.
सदर पत्रक भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष व साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांना देण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा भाजपाचे युवा नेते व मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल भाजपाचे प्रांतिक निमंत्रित सदस्य दिपक चव्हाण, नाईक-निंबाळकर यांचे कोऑर्डिनेटर श्री.मोहिते आदी उपस्थित होते, यावेळी दलित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत रश्मी बागल यांनी केले या पाठिंबामुळे खासदार निंबाळकर यांचे पारडे माढा लोकसभा मतदारसंघात जड झाले आहे, असे म्हटले जात आहे.


