हिंदू-मुस्लिम ऐक्य व सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जमीर सय्यद यांचा करमाळा पोलिसांकडून सन्मान

करमाळा(दि.३०): करमाळा येथे दरवर्षी गणेशोत्सव दरम्यान प्रत्येक गणेश मंडळांची मिरवणुक जामा मस्जिद येथे आल्यानंतर मस्जिदकडून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जाते. तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे, मिरवणुकीत बंदोबस्तातासाठी असणारे पोलीस बांधव यांचे फेटा बांधून व हार घालून सत्कार केला जातो. हिंदू-मुस्लिम ऐक्य व सामाजिक सलोखा जपण्याच्या या कार्याचा करमाळा पोलीस स्टेशनकडून सन्मान करण्यात आला. जामा मस्जिदचे विश्वस्त अध्यक्ष जमीर सय्यद यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.
करमाळा पोलीस स्टेशन यांच्या वतीने 2024 मधील गणेशोत्सव दरम्यान चांगले कार्य करणाऱ्या गणेश मंडळाना व सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना उत्कृष्ट समाजपयोगी कार्याबद्दल बुधवारी दि.२९ गौरविण्यात आले. करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अजित पाटील व करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे व इतर मान्यवरांच्या हस्ते जमीर सय्यद यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी हा उपक्रम दरवर्षी राबविणारे मुस्लीम समाजातील रमजान बेग, आझाद शेख, अलिम खान, दिशान कबीर, सुरज शेख, जहाँगीर बेग, शाहीद बेग, व इतर मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.
जामा मस्जिदचे माजी विश्वस्त अध्यक्ष पैगंबरवासी कासम भाई सय्यद पत्रकार यांच्या प्रेरणेने सामाजिक सलोखा व एकात्मता वाढविण्यासाठी गेल्या ३९ वर्षांपासून मुख्य मिरवणूक मार्गावर येणारे गणेश मंडळांचे स्वागत करण्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु फुले आंबेडकर यांचे विचार आदर्श मानून यापुढेही आपले सामाजिक कार्य चालू राहील. मुस्लीम समाजातील युवकांना सोबत घेऊन मुस्लीम समाजाला इतर समाजा बरोबर योग्य प्रवाहात आणण्यासाठी जेष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.
● जमीर सय्यद, करमाळा






