महापुरुषांचे जयंती उत्सव हे डि. जे. मुक्त साजरे करावेत – तहसीलदार शिल्पा ठोकडे

करमाळा(दि.२२): डीजे मुक्त व अनावश्यक खर्चाला फाटा देत मांगीतील नवयुग मित्र मंडळाने जी शिवजयंती साजरी केली याचा आदर्श तालुक्यातील इतर मंडळांनी घ्यावा. महापुरुषांचे जयंती उत्सव हे डि. जे. मुक्त साजरे करावेत असे आवाहन देखील करमाळ्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मांगी येथे व्यक्त केले.
मांगी (ता.करमाळा) येथील नवयुग मित्र मंडळाच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जेष्ठांच्या हस्ते पूजन करून सायंकाळी पारंपारिक भारुड व नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आदर्श जयंती साजरी करणाऱ्या मांगी येथील नवयुग मित्र मंडळ व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांचा करमाळा येथील तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना शिल्पा ठोकडे म्हणाल्या की, करमाळा तालुक्यातील विविध ठिकाणी साजरे करण्यात येणारे जयंती उत्सव अशाच आदर्श पद्धतीने साजरे करायला हवे. जेणेकरून नवीन पिढीला “डी.जे “मुक्त मिरवणुकांची सवय लागेल. आजकालच्या तरुण पिढी ला जयंती मिरवणूक म्हटलं की कर्कश आवाजात वाजणारे महागडे “डी.जे “हे समीकरण प्रचंड आवडू लागले आहे .परंतु यामुळे गावामध्ये .शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. घरांना तडे जाणे, कित्येक लोकांना हार्ट अटॅकचा त्रास होत आहे. कित्येक लोकांना कायमस्वरूपी बहिरेपणा येत आहे. त्याचप्रमाणे मिरवणुकांमध्ये बेधुंद होऊन नाचणारी नवीन पिढी ही व्यसनाच्या आहारी जात आहे. म्हणून माझी करमाळा तालुक्यातील सर्व जयंती उत्सव कमिटी सदस्यांना विनंती आहे की त्यांनीही मांगी येथील नवयुग मित्र मंडळा सारखे आदर्श पद्धतीने जयंती साजरी करावी .आणि जास्तीत जास्त सामाजिक प्रबोधन भारुड, किर्तन ,महाप्रसाद, पारंपारिक वाद्य यांचा वापर करावा जेणेकरून डी.जे.च्या आहारी गेलेल्या नवीन पिढीला या नवं संकल्पनेतून काहीतरी नवीन शिकायला भेटेल.

यावेळी मांगी येथील नवयुग मित्र मंडळाच्या सदस्यांचा तहसीलदार सौ शिल्पाताई ठोकडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला नवयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष ऍड. विक्रम चौरे, सचिव राहुल जाधव, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष उमेश बागल, शरद बागल, सुप्रसिद्ध गायक व पत्रकार प्रविण अवचर, प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र जमदाडे, श्रीराम फायनान्सचे श्री नितीन लांडगे ,राहुल बागल शिवाजी राऊत आदीजन उपस्थित होते.



