पुरग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत वाटप- तहसीलदार शिल्पा ठोकडे

करमाळा(संदेश प्रतिनिधी): तालुक्यातील पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत वाटप करण्यात आली असून प्रत्येकी दहा हजार रुपये थेट बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली.


तालुक्यातील एकूण ५८५ घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामधील सुमारे १२०० ते १३०० नागरिकांना पुराचा मोठा फटका बसला, तर अशा धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या २२०० लोकांचे स्थलांतर सुरक्षितस्थळी करण्यात आले होते. या ५८५ कुटुंबांपैकी ५६५ कुटुंबांच्या खात्यावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार दसऱ्यापूर्वीच प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. त्यापैकी २० जणांचे खातेनंबर किंवा नाव चुकीचे असल्याने रक्कम जमा न होता प्रलंबित आहे, तर आणखी २० जणांची माहिती अद्याप प्राप्त व्हायची आहे. या उर्वरित 40 कुटुंबांनाही लवकरच मदत दिली जाईल, असे ठोकडे यांनी सांगितले.


पूरात शेती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी पंचनामे सुरू आहेत. पिकांचेही पंचनामे सुरू असून ज्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, तिथे ‘नॉट कॅप’च्या माध्यमातून छायाचित्रे घेऊन नोंद केली जात आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण होतील आणि त्यानंतर शासनस्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

पूरग्रस्तांसाठी विविध सामाजिक संस्था, व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. चादरी, ब्लँकेट, किराणा साहित्य आदींच्या स्वरूपात मदत मिळाली असून मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. पुढील काळात नदीकाठच्या ११ गावांसह इतर आठ गावांतील विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तके आणि वह्या भिजल्याने त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी मदतीचे आवाहनही शिल्पा ठोकडे यांनी केले आहे.



