करमाळा आगारातील एसटीच्या प्रश्नांवर तहसीलदार यांची बैठक संपन्न – आगार प्रमुखांना दिल्या सूचना
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – मागील काही दिवसापासून करमाळा एसटी आगारातील विविध प्रश्नांवर प्रश्नांवर तालुक्यात जोरदार चर्चा चालू होती. करमाळा आगारातील एसटी बसेस रोज विविध ठिकाणी विविध कारणाने बंद पडत असून यावर सामान्य नागरीकांपासून, पत्रकारांसह, लोक प्रतिनिधींनी सोशल मीडियावर आवाज उठवला होता. सामान्य माणसाचा आधार असलेल्या एसटीचे प्रश्न सोडवून उत्कृष्ट दर्जाच्या बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी मकाई संघर्ष समिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी 5 जानेवारी रोजी मकाई संघर्ष समिती बरोबर करमाळा एसटी आगाराचे व्यवस्थापक यांची सदर विषयावर बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
या बैठकीला ॲड. राहुल सावंत, दशरथ आण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ, वामनदादा बदे, रवींद्र गोडगे, हरिदास मोरे, गणेश वाळूंजकर, शहाजी माने, बाळासाहेब गायकवाड, गणेश वाळूंजकर, हरिदास मोरे, शहाजी माने, व सर्व पत्रकार विशाल घोलप,सुनिल भोसले, अशोक मुरूमकर, समाधान फरतडे, अश्पाक सय्यद, सिध्दार्थ वाघमारे, नाशीर कबीर, विशाल परदेशी, हर्षवर्धन गाडे, भालचंद्र गाडे आदीजन उपस्थित होते. या बैठकीत एसटी बसेसच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी एसटी आगार व्यवस्थापक वीरेंद्र होनराव यांना लवकरात लवकर एसटी वाहतूक सुरळीत करण्याचे सक्तीचे आदेश दिले. ज्या सध्या परिस्थितीत चालू असणाऱ्या गाड्या तात्काळ कॅम्प लावून दुरूस्ती कराव्यात आणि प्रवाशांना चांगली सेवा द्यावी, बसेस वेळेवर सोडाव्यात, मुलींचे पास प्रत्येक महिन्याला शाळेत जाऊन देण्यात यावेत, एसटी बस स्वच्छ असावी, करमाळा डेपो ची एसटी बस बाहेर गेले पासून परत डेपोत येईपर्यंत रोडवर बंद पडणार नाही याची काळजी घ्यावी, एसटी स्टँडवर व परिसरात स्वच्छता असावी, बंद ठिकाण च्या मुक्कामी एसटी बस त्वरित चालू कराव्यात आणि लवकरात लवकर एसटी वाहतूक सुरळीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या.