बिल्डिंगचे काम अपूर्ण असताना देखील बोगस पूर्णत्वाचा दाखला दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी – सदनिका धारकांनी दिले तहसीलदारांना निवेदन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील न्यु करमाळा टाऊनशिप मधील बिल्डिंगचे काम अपूर्ण असताना देखील बोगस पूर्णत्वाचा दाखला दिलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होणेबाबत तक्रारीचा अर्ज सदर बिल्डिंगच्या सदनिका धारकांनी करमाळा तहसीलदार यांना दिला आहे.
याविषयी दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, करमाळा ग्रामीण मधील न्यु करमाळा टाऊन शिप येथील गट नं. २२३/१/क/४ येथील शिशिर बिल्डींग नं. ३ चे क्षेत्र ४.१२० स्वे. मी. ही मिळकत माऊली बिल्डकॉन यांनी विकसित केलेली आहे व करीत आहेत. सदर मिळकतीवरील मे. श्री. माऊली बिल्डकॉनने शिशिर बिल्डींग नं. ३ या नावाने बिल्डींग नकाशा मंजूर करून इमारत बांधण्याचे काम सुरू करून त्यातील निवासी सदनिका वेगवेगळ्या ग्राहकांना विकलेल्या आहेत. सदर निवासी प्रकल्प हा रेरा कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असून सदर बिल्डींगचे कामही ०८/०१/२०२४ पर्यंत देखील अपूर्ण आहे. तरीसुध्दा यांनी उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांचेकडून जामा बंदी कावि ३०५/२०२२ अन्वये भोगवटा प्रमाणपत्र दि. १५/०२/२०२२ रोजी घेतलेले आहे. कामे अपूर्ण असताना देखील अधिकाऱ्यांनी कोणत्या आधारावर पूर्णत्वाचा दाखला दिला याची चौकशी होवून संबंधित अधिकारी यांचेवर कारवाई करावी व माऊली बिल्डकॉन पार्टनर यांना आम्ही वारंवार मुदत देवून देखील त्यांनी काम पूर्ण केले नाही. आम्हांला नोटरी करून दिलती त्याची मुदत देखील संपली आहे. जर यावर काही कार्यवाही झाली नाही तर येत्या २६ जानेवारीला करमाळा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
सदर निवेदनावर प्लॅटधारक अभिजीत भाऊसाहेब वाघमोडे, विजय दिगंबर केंडे किरण राजु शेंदरकर, प्रताप सुभाष वळेकर, गणेश हरिदास कोकाटे, बालाजी तुंदारे, दत्तात्रय गायकवाड, शुभम विजय सुपेकर आदींच्या सह्या आहेत.