“शिक्षकच समाजाचा पाया घडवतात ” – डॉ. बाबूराव हिरडे

करमाळा, ता.१०: “आई-वडिलांची भूमिका निभावत शिक्षक लहान मुलांचे भविष्य घडवतात. जे काम पालक करत नाहीत ते शिक्षक आपल्या संस्कारांनी करतात आणि म्हणूनच समाजाची प्रगती शिक्षकांच्या योगदानातूनच होत असते. शिक्षकाचे महत्त्व कालही होते, आजही आहे आणि उद्याही तितकेच राहणार आहे,” असे मत ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष व संतसाहित्य अभ्यासक डॉ. ॲड. बाबूराव हिरडे यांनी व्यक्त केले

पोंधवडी येथे बदली झालेले शिक्षक संजय चोपडे, सुनिल वाघमारे व सौ. मोहिनी वाघमारे तसेच केंद्रप्रमुख भैरू गभाले यांचा निरोप आणि नव्याने रुजू झालेले बापुराव भोसले, विष्णु माने व सौ. उज्वला माने यांच्या स्वागत समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ‘सकाळ’चे पत्रकार अण्णा काळे आणि केंद्रप्रमुख आदिनाथ देवकते उपस्थित होते.


पुढे बोलताना डॉ. हिरडे म्हणाले, “एआय तंत्रज्ञानाने डॉक्टर, इंजिनिअर, वकील यांची जागा घेतली तरी शिक्षकाची जागा कोणतेही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. उलट या बदलत्या काळात शिक्षकांची जबाबदारी अधिक वाढली आहे.”
पत्रकार अण्णा काळे म्हणाले, “शिक्षक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चांगला शिक्षक विद्यार्थ्यांसाठी दैवतासमान असतो. शिक्षक एका दिवसासाठीही गैरहजर राहिले तर विद्यार्थी स्वतः संपर्क साधतात, हा अनुभव मी घेतला आहे.”


केंद्रप्रमुख आदिनाथ देवकते यांनी बदलती शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात झालेल्या आमूलाग्र परिवर्तनावर भाष्य केले. “या परिस्थितीत शिक्षकांना अधिक सतर्क राहावे लागत आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात केंद्रप्रमुख बहिरू गभाले व शिक्षक संजय चोपडे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक पोंधवडीचे माजी सरपंच प्रतिनिधी रघुनाथ राऊत यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक श्री. म्हेत्रे यांनी केले.


कार्यक्रमास कीर्तनकार शामसुंदर ढवळे (दौंड), मृदुंगाचार्य संतोष महाराज भोसले, किशोर महाराज जाधव, रेडिओ स्टोअर पर्वत, आबा काळे, गायनाचार्य सुनील पोकळे, सोमनाथ राऊत, संदीप भाकरे, संजय निकम, बापूराव कोठावळे, अक्षय कदम, बापू जाधव, राजाभाऊ मुकदम, बलभीम गोडगे, दादा दुरंदे, उद्धव बापू नाळे, धुळा बापू कोकरे, दादा सारंगकर, रामदास चव्हाण पाटील, माऊली कानगुडे, संदीप सरडे, हरिदास सानप, अनिल शिंदे, बापूराव दुरंदे, सुनील भास्कर पाटील, भालचंद्र नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.



 
                       
                      