धनगर आरक्षणासाठी करमाळ्यात सकल धनगर समाजाचे धरणे आंदोलन

करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता.26: जालना येथे 16 सप्टेंबरपासून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मल्हार योद्धा दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला आज दहा दिवस पूर्ण झाले. या उपोषणाला पाठिंबा म्हणून करमाळा तालुक्यातील सकल धनगर समाजाने तहसील कार्यालयासमोर आज (ता.26)एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात तालुक्यातील धनगर समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी समाजातील विविध घटक व इतर संघटनांनीही आपला पाठिंबा दर्शवला.
आंदोलनावेळी समाजातील नेत्यांनी सरकारवर टीका करताना धनगर समाजाचे आरक्षण हे हक्काचे असल्याचे स्पष्ट केले.

> “धनगर समाजाचे आरक्षण हे हक्काचे आरक्षण आहे. मात्र सरकारने ते कागदोपत्री प्रक्रियेत अडकवून ठेवले आहे. हे आरक्षण आम्ही मिळवणारच. त्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक समाजबांधवाने या लढ्यात खांद्याला खांदा लावून उभे राहिले पाहिजे. आंदोलनास बळ देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इतर समाजघटकांनीही या आंदोलनाला पाठिंबा द्यावा.”
– प्रा. शिवाजीराव बंडगर, मा. सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, करमाळा.

यावेळी
गंगाराम वाघमोडे सर, जेऊरचे लोकनियुक्त सरपंच पै. पृथ्वीराज पाटील, तसेच बाळासाहेब टकले, पोथरे सरपंच अंकुशराव शिंदे, राष्ट्रीय मोर्चाचे अंगद देवकते, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती पै. अतुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, सतीश नीळ,काँग्रेस नेते सुनील सावंत, शेतकरी संघटनेचे नेते अण्णा सुपनवर, डॉ. समाधान कोळेकर आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून आंदोलनाला पाठिंबा दिला.



