विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व सातत्य अंगी बाळगून कृषि उद्योजक बनावे — दिपक देशमुख

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.१:“शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या व्यवसायात अनेक अडचणी असल्या तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. शैक्षणिक टप्प्यातच व्यावसायिक दृष्टिकोन जोपासून स्वतःला कृषि उद्योजक म्हणून घडवा,” असे मत लोकविकास डेअरीचे चेअरमन दिपक देशमुख यांनी व्यक्त केले.

हाळगाव (ता. जामखेड) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात कृषि पदवीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित दीक्षारंभ कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय सोनवणे होते.

पुढे बोलताना श्री. देशमुख म्हणाले, की “शेतीला केवळ व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडून व्यावसायिक संधी निर्माण करा. प्राथमिक उत्पन्नासाठी दुय्यम व्यवसायाची जोड महत्त्वाची आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, रेशीमउद्योग यांसारख्या क्षेत्रात मोठी संधी आहे. बहूपीक पद्धती अवलंबल्यास एका पिकातील तोटा दुसऱ्यातून भरून येतो. यावेळी डाॅ. सोनवणे यांचेही भाषण झाले.



या कार्यक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही स्वतःचा परिचय देत उपस्थितांसमोर आपली स्वप्ने आणि उद्दिष्टे शेअर केली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, हाळगाव व परिसरातील प्रगतशील शेतकरी तसेच डॉ. दीपक वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गोकुळ वामन यांनी केले. डॉ. उत्कर्षा गवारे यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली. डॉ. प्रणाली ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले तर अर्चना महाजन यांनी आभार मानले
