शहिदांना मानवंदना देत करमाळ्यात २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथे २६ जुलै रोजी आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा व यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने शहिदांना मानवंदना देत २५ वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा केला. यावेळी कारगील युद्धामध्ये सहभागी सैनिकांनाचा सन्मान करण्यात आला.
यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा.गणेश करे-पाटील यांनी शहिदांना मानवंदना देत वीर माता,वीर पिता आणि वीर पत्नी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली, भारतीय सैनिकांच्या शौर्याचे जयगान केले. कारगील विजय दिवस हा युवकांसाठी प्रेरणादिन ठरावा, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना करे-पाटील म्हणाले की, भारतीय जवान बर्फाच्छादित डोंगराळ प्रदेशात राहून ‘मायनस डिग्री तापमानांमध्ये आपल्या सीमेचे रक्षण करत असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी आदर असला पाहिजे. सेनेमध्ये सेवा करण्याची संधी मिळणे हे परमभाग्य असते. या क्षेत्रातील संधीकडे करमाळा तालुक्यातील नवयुवकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत’ करे यांनी व्यक्त केले.
ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड. बाबूराव हिरडे भाषणात म्हणाले की, “सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याची संधी ज्यांना मिळाली नाही त्यांनी आज समाजामध्ये विविध क्षेत्रांमध्ये समाजाची गरज ओळखून सेवा केली पाहिजे”. सोलापूर जिल्हा आजी माजी संघटनेचे अध्यक्ष अरुण कुमार तळीपाडे म्हणाले, “देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सैनिकांची आजही अनेक ठिकाणी उपेक्षा होताना दिसते सैनिकाला सर्वांनी योग्य तो मानसन्मान कायम दिला पाहिजे. माजी सैनिकांना काही अडचणी असतील तर त्यांनी आपणाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.”
कॅप्टन विलास नाईकनवरे म्हणाले, “कारगिल युद्धाचा प्रसंग आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असून त्या आठवणी आज आल्या तरी अंगावर रोमांच उभे राहतील या लढाईमध्ये अनेक भारतीय जवान हुतात्मा झाले. आजच्या या दिनानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या पाहिजेत व देश सेवेसाठी त्यागाची भावना कायम मनामध्ये जागृत ठेवली पाहिजे.”
या कार्यक्रमात कारगिल युद्धामधील कामगिरीबद्दल कॅप्टन विलास नाईक नवरे, कॅप्टन शिवाजी भंडारे, सुभेदार सुरेश आदलींग यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मेजर मनेश पाटील,नाईक सुभेदार बोलभट यांचा देखील सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात गणेश करे-पाटील यांचा आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने ‘सैनिक मित्र’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल करमाळा तालुक्यातील खालील व्यक्तींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
- पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गजेंद्र पोळ
- निसर्ग संवर्धन क्षेत्रातील कामाबद्दल पक्षीमित्र कल्याणराव साळूंके,
- रुग्णवाहिका सेवेबद्दल माजी सैनिक रुग्णवाहिकेचे साजिद शेख,
- माजी सैनिक कन्या अश्विनी कुंभार यांची कृषी सहाय्यक पदी निवड
- कु.श्रीनाथ उदमले (महाराष्ट्र पोलिस दलात निवड)
यावेळी साजिद शेख यांनी सुरू केलेल्या माजी सैनिक सेवा रूग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील एन सी सी विभागाचे विद्यार्थी यांना सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. योद्धा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उपस्थित होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चे भाऊसाहेब माने,दिगंबरराब साळुंके,प्रा.राम काळे ॲंड. सोनवणे, भिवा वाघमोडे, प्रकाश लावंड उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर अक्रुर शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन माया भागवत व मेजर किरण ढेरे यांनी केले.