‘एजंटांनी अडीच लाख रूपये घेऊन नवरदेवाची केली फसवणूक – पोलीसाकडे तक्रारी अर्ज…
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.१३) : अलिकडच्या काळात विवाहसाठी मुलींची संख्या कमी असल्याचा गैरफायदा घेत अनेक एजंटांनी लग्न जमविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. एवढेच नाहीतर अनेक एजंट तात्पुरते लग्न लावतात आणि पसार होतात. तसेच लग्नाची नवरी चार – आठ दिवस थांबते आणि कायमची पसार होते. अशी स्थिती पोथरे येथील एका नवरदेवाची झाली आहे. एजंटांनी चक्क अडीच लाख रूपये घेतले तर लग्नाला दीड लाख रूपये खर्च करून आणलेली नवरी अवघ्या आठच दिवसात पसार झाली आहे. या प्रकरणी नवरदेवाने पोलीसात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी पोथरे येथील झिंजाडे नामक युवकाने ही फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की जामखेड तसेच हुबळी ( धारवाड) येथील एजंटांनी तुझे चांगल्या मुलीशी लग्न लावतो.. असे म्हणून माझ्याकडून अडीच लाख रूपये घेतले तसेच स्वाती वाघ नावाच्या मुलीस आणून तिचा माझ्याबरोबर २४ एप्रिल रोजी विवाह लावून दिला. या विवाहवेळी दागिणे, जेवणावळ, मंडप यासाठी माझे दीड लाख रूपये खर्च झाले आणि माझी झालेली नवरी चक्क आठ दिवसात म्हणजे २ मे च्या मध्यरात्री पसार झाली आहे. याबाबत शोध घेऊन आणि एजंटाशी संपर्क साधूनही हाती काही लागले नाही. त्यामुळे या सर्वांनी माझी फसवणूक केली आहे. त्यांचेविरूध्द गुन्हा दाखल व्हावा; असेही या फिर्यादीत म्हटले आहे.