‘मकाई’कारखान्याच्या थकित बिलासाठी शेतकऱ्याचे पेटवून घेवून आत्मदहनाचा प्रयत्न – आंदोलनकर्त्यांनी केले बोंबाबोंब आंदोलन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.२८) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रलंबित उसाच्या बिलासाठी आज (ता.२८) करमाळा तहसील कार्यालयासमोर आज बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले होते, परंतु तहसीलदार यांच्यासमोर शेतकऱ्यांच्यावतीने ॲड.राहुल सावंत हे बोलत असताना पोटेगाव-तरटगाव येथील ऊस उत्पादक शेतकरी हरिदास मोरे यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला वेळीच पोलीस व आंदोलन कर्त्याच्या मध्यस्थीमुळे सदरचा आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यावेळी मात्र प्रचंड गर्दी तसेच एकच गोंधळ उडला.

तरटगाव येथील शेतकरी हरिदास मोरे यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याने प्रलंबित उसाचे बिले द्यावेत या मागणीचे निवेदन संबंधित जिल्हाधिकारी तहसीलदार साखर आयुक्त तसेच चेअरमन मकाई सहकारी साखर कारखाना यांना निवेदन दिले होते, मात्र तरीदेखील निवेदनाची कोणतीही मकाई कारखान्याने दखल न घेतल्यामुळे अखेर श्री मोरे यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रलंबित उसाच्या मागणीसाठी आज बोंबाबोंब आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

मकाई सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून बागल गटाच्या ताब्यात आहे. गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाचे अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. संगोबा येथे झालेला आमरण उपोषणावेळी दिलेली मुदतही संपून गेली आहे. तरीही पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या संबंधित चेअरमन सहित संचालक मंडळाने याची कोणतीही दखल घेतली नाही असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे येत होते. थकीत उसाचे बिल कारखान्याने न दिल्यामुळे पोटेगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न केला तेव्हा संचालक मंडळासहित प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असाही इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनावेळी प्रा.रामदास झोळ, शेतकरी संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड.राहुल सावंत, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब गायकवाड आदीजण उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव, पोलिस निरिक्षक ज्योतीराम गुंजवटे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!