तालुक्यातील १९ पोलीस पाटीलांच्या नेमणूका जाहीर – सावडी येथील उमेदवाराची आयुक्ताकडे तक्रार
करमाळा/ संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा तालुक्यातील १९ गावांच्या पोलीस पाटील पदाच्या निवडीबाबतच्या मुलाखती ११ मार्चला घेण्यात आल्या. त्यानंतर जादा गुण मिळालेल्या प्रतिनिधींच्या नेमणुका उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी जाहीर केल्या आहेत. या नेमणुका जाहीर झाल्यानंतर सावडी येथील उमेदवार शहाबुद्दीन अमीन सय्यद यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे लेखी तक्रार दिली असून झालेली निवड रद्द करण्यात यावी; अशी मागणी केली आहे.
पोलीस पाटील निवडीसाठी गेल्या काही महिन्यापूर्वी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर काही उमेदवारांनी व लोकप्रतिनिधींनी या निवडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मुलाखतीचे काम थांबविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार ८ मार्चला मुलाखतीचा दिवस व वेळ जाहीर करून संबंधित उमेदवारांना ११ मार्चला बोलविण्यात आले होते. त्यानंतर त्याच दिवशी ज्या उमेदवाराला जास्त गुण मिळाले त्या उमेदवारांना पोलीस पाटील म्हणून नेमणुक केल्याचे जाहीर केले. त्यानुसार करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली येथे शितल ज्ञानदेव गलांडे, कोर्टी येथे शुक्राचार्य चंद्रशेखर जाधव, खडकी येथे अक्षय अशोक पाटील, जातेगाव येथे स्मिता प्रविण शिंदे, झरे येथे कल्याणी विकास आमृळे, धायखिंडी येथे तुकाराम दादा मोटे, निमगाव ह येथे अक्षय संजय कुंभार, पारेवाडी येथे धर्मराज चंदू काळे, पिंपळवाडी येथे भाग्यश्री विश्वास काळे, पोफळज येथे मीना अजित पवार, बिटरगाव वांगी येथे काजल भगवान हजारे, बोरगाव येथे विनोद महादेव गायकवाड, लव्हे येथे सचिन गंगाराम दगडे, वडगाव उत्तर येथे समाधान भारत भांडवलकर, वडाचीवाडी येथे सुदेश बेस शिंदे, विहाळ सुप्रिया आबा भुजबळ, शेलगाव क शितल सचिन कुकडे, सावडी येथे मारुती पांडूरंग शेळके, हिसरे येथे संतोष शंकर काळे यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
पोलीस पाटीलच्या नेमणुका जाहीर झाल्यानंतर सावडी येथे शहाबुद्दीन अमीन सय्यद यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांचेकडे तात्काळ लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १७ डिसेंबर २०२३ ला पोलीस पाटील पदाबाबत गैरप्रकार झाल्याचे कळवले होते. त्याची शहनिशा न होता मुलाखती घेण्याचे पत्र दिले. ते पत्र आम्ही स्विकारले नसताना आमच्या घराला चिटकवले. सुट्टी असूनही सदरचा आदेश काढण्यात आला आहे. यावरून यात गैरप्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. मारुती पांडूरंग शेळके याने परीक्षेचा कोरा पेपर दिलेला असताना त्यांना मार्क कसे मिळाले व त्याची नेमणूक कशी झाली हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व आयुक्त काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे