‘बागल गट’ उद्या मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत ‘भाजपा’त प्रवेश करणार..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सध्या निवडणुकांच्या पाश्वर्भूमीवर करमाळ्यातील राजकारणात जोरदार हालचाली सुरु झालेल्या आहेत, करमाळ्याच्या राजकारणातील बागल गट हा महत्त्वाचा गट मानला जाणारा बागल गट उद्या (ता.27) मुंबई येथील भाजपा च्या प्रदेश कार्यालयात हजर राहुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश पक्षप्रवेश करणार आहेत.
बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल-कोलते व बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर त्यांनी मागील विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदेंच्या नेतृत्वाखालील मंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबर शिवसेनेत आले. सध्या बागल गटाने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे.
करमाळा शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून बागल गट कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा सुरू होती. एकंदरीत बागल गटाने राजकीय वर्तुळ पूर्ण केले आहे. आता भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने विधानसभेची जागा महायुतीतून कोणाला मिळणार आणि तेव्हा एकमेकांना साथ देणार का? अशी चर्चा करमाळ्यात सुरू झाली आहे.