साडे येथील विद्यार्थी वस्तीगृहात उद मांजराचा वावर विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाली भीती
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – साडे (ता.करमाळा) येथील साडे हायस्कूलच्या विद्यार्थी वस्तीगृहात रात्रीच्या वेळी उद मांजराने ये जा सुरू केले आहे. हे विद्यार्थी वस्तीगृह दुसऱ्या मजल्यावर असून रात्रीच्या वेळी उद मांजर या वस्तीगृहात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वस्तीगृहाच्या शेजारी प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्राच्या एका खोलीमध्ये उद मांजराने आपल्या पाच पिल्लांना जन्म दिला आहे . हे उद मांजर प्राथमिक आरोग्य केंद्र व विद्यार्थी वस्तीगृह या ठिकाणी वावरत आहे. उद मांजराच्या वावरामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. साडे हायस्कूलचे शिक्षक व शिक्षक भारतीचे तालुका सचिव सचिन गाडेकर यांनी वनविभाग कार्यालय मोहोळ या ठिकाणी संपर्क करून उद मांजरास पकडून त्याच्या नैसर्गिक राहण्याच्या ठिकाणी सोडण्यात यावे याविषयी विनंती केली.
करमाळा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली आहे. आपल्या देशातील भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार उद मांजरास वन्यजीव संरक्षण मिळाले आहे. या कायद्याअंतर्गत वनविभागाने या उद मांजराचे रेस्क्यू ऑपरेशन करून त्यास मानवी वस्तीतून त्याच्या नैसर्गिक राहण्याच्या ठिकाणी सोडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उदमांजर व त्याच्या पिल्लांच्या वावरामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मोहोळ वनविभागाला संपर्क केला असून लवकरात लवकर उदमांजराचे रेस्क्यू ऑपरेशन करण्याविषयी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
–विजयकुमार गुंड, जिल्हा प्रवक्ता,शिक्षक भारती, सोलापूर