माढा लोकसभेसाठी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे देखील प्रयत्न चालू होते परंतु अखेर विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेच नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मोहिते पाटील गटात नाराजी असणार आहे.

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पाठिंब्याने २०१९ साली निंबाळकरांनी माढा लोकसभा मतदार संघ सर केला होता. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमधून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने २०२४ ला अकलूज आणि माळशिरस मधून भाजपला लीड मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पक्ष नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबाबत मी आभारी आहे. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये विकास कामांचा ओघ असाच सुरू राहणार असून मतदार पुन्हा एकदा मतरुपी आशीर्वाद देतील असा विश्वास आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

करमाळा भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष :

करमाळा भाजपा संपर्क कार्यालयांत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतीशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी करमाळा शहरातुन हलग्या व फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यालय – सुभाष चौक – जय महाराष्ट्र चौक – भवानी नाका ते सुभाष चौक अशी रॅली काढली .यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी बोलताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की,भारतीय जनता पार्टीने महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी, नेते यांच्यात आनंदाचे वातावरण आहे,.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना गत निवडणुकीपेक्षा जास्त लीड यावेळी मिळणार आहे. करमाळा तालुक्यातील अनेक वर्षे रखडलेले सिंचन, रेल्वे, रस्ते इत्यादी प्रश्न खासदार निंबाळकर यांनी ग्राउंड लेवलला येऊन सोडवले आहेत. राहिलेले प्रश्नही आगामी काळात सोडवण्यासाठी आम्ही सर्व ताकतीनीशी त्यांना पुन्हा खासदार करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,तालुका सरचिटणीस,सरपंच काकासाहेब सरडे,शहराध्यक्ष जगदीश आगरवाल,जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव,जिल्हा चिटणीस विनोद महानावर,माढा लोकसभा सोशल मीडिया संयोजक नितीनभाऊ झिंजाडे,उपसरपंच अमोल पवार,किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे,अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष दिनेश मडके,किरण शिंदे,बिभीषण गव्हाणे,शाम सिंधी,नरेंद्र ठाकूर,भैय्याराज गोसावी,गणेश महाडिक,जयंत काळे पाटील,वसीम सय्यद, गणेश माने इत्यादी बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!