बाईपणाचा संघर्ष! -

स्त्री म्हणजे सौंदर्य नाही, तर सामर्थ्य, संयम आणि सहनशक्तीचा अद्वितीय संगम असतो. तिच्या व्यक्तिमत्त्वात स्वप्न साकार करण्याची जिद्द, संकटांचा सामना करण्याची ताकद आणि प्रत्येक अडथळ्याला तोंड देण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. शृंगार करून सजलेल्या स्त्रीपेक्षा, संघर्ष करून उभी राहणारी, प्रयत्नशील स्त्री अधिक सुंदर आणि प्रभावी वाटते.

स्त्रिया संघर्षातून घडत जातात. त्या कधीही हार मानत नाहीत. घरातील जबाबदाऱ्या असोत किंवा समाजातील आव्हाने — प्रत्येक टप्प्यावर तिला स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करावा लागतो. सहकार्य मिळेलच, ही अपेक्षा तिच्या प्रवासात क्वचितच खरी ठरते. म्हणूनच प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल, संघर्ष करतच तिला पुढे टाकावे लागते.

‘बाईपणाचा’ हा संघर्ष फार कठीण असतो. ती सतत काही ना काही गमावते, तरीही दुसऱ्यांसाठी हास्याने उभी राहते. स्वतःच्या स्वप्नांमागे धावत, ती घर, समाज आणि संसार यांच्यात समतोल राखते. ती कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी तर कधी एक कुशल कार्यकर्ती असते. अशा स्त्रीचे रूप म्हणजेच लक्ष्मी, दुर्गा, आणि शक्ती यांचे मूर्त स्वरूप होय.

आज सरकारकडून महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. पण त्या योजनांचा फायदा घेण्यासाठी महिलांना जागरूक आणि साक्षर होणे गरजेचे आहे. निरक्षरतेमुळे अनेक स्त्रियांना अन्याय सहन करावा लागतो. शिक्षण हे स्त्रीच्या सक्षमीकरणाचे पहिले पाऊल आहे. मानसिकदृष्ट्याही ती सक्षम असावी लागते. अनेकदा मानसिक थकवा, अडथळे, अपमान, आणि एकटेपणा यामुळे काही स्त्रिया आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. ही खूपच वेदनादायक गोष्ट आहे.

यासाठीच मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक पातळीवर स्त्रीला सक्षम करणे गरजेचे आहे. बालपण, किशोरपण आणि प्रौढपण — या प्रत्येक टप्प्यावर तिचा संघर्ष वेगवेगळा असतो, पण प्रत्येक टप्प्यावर ती अधिक कणखर बनत जाते. आजच्या स्त्रीमध्ये जग बदलण्याची ताकद आहे. ती डॉक्टर, पोलीस अधिकारी, सैनिक, वैज्ञानिक, उद्योजिका अशा विविध भूमिका उत्तम प्रकारे निभावत आहे.

परंतु, आजही समाजात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आजही गंभीर आहेत. ‘महिला राज’ म्हणत असतानाही अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहेत. दुर्दैवाने काही वेळा महिलाच महिलांविरोधात कटकारस्थान करताना आपल्याला अनुभवास येते. असे असले, तरीही काही महिला अशा असतात की त्या इतर महिलांना साथ देतात, त्यांच्या हक्कांसाठी लढतात.

माझ्या तमाम भगिनींना एकच विनंती – कोणताही गैरसमज किंवा मतभेद असो, समजुतीने वागा. एकमेकींशी स्पर्धा न करता, एकमेकींची साथ द्या. कारण आपण जर आपसात फूट पाडली, तर समाजात आपल्याला कोणीही सहकार्य करणार नाही. स्त्रिया जर एकमेकींसाठी आधार बनल्या, तर प्रत्येक संकट सहज पार करता येते आणि समाजात एक आदर्श महिला म्हणून आपली ओळख निर्माण होते. स्त्री जेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करते, तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजासाठीही प्रेरणा ठरते. अशा सर्व संघर्षशील महिलांना मनापासून सलाम!

✍️सौ.आशाताई चांदणे (महिला जिल्हाध्यक्षा, बहुजन मराठी पत्रकार संघ, सोलापूर)

सौ.आशाताई चांदणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!