‘ग्राहक चळवळ’ पोरकी झाली..!

24 डिसेंबर 2023, राष्ट्रीय ग्राहक दिन, नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी नऊ वाजता माझ्या मिस्टरांचा फोन आला आणि त्यांनी “अगं पाठक सर गेले” अशी दुःखद बातमी दिली. आदरणीय पाठक सर (सचिव, मध्य महाराष्ट्र प्रांत) अचानक निघून गेल्याची दुःखद बातमी ऐकताच एकच स्वार्थी विचार मनात आला की, “आता करमाळा तालुक्यातील ग्राहक चळवळ पोरकी झाली…! परंतु क्षणात विचार आला, की ज्या वहिनींनी पाठक सरांना आयुष्यभर ग्राहक चळवळ, सामाजिक कार्य, सतत जनसंपर्क इत्यादी सर्व गोष्टींना हसत व आनंदाने, प्रकृतीची साथ असो किंवा नसो कायम स्वरूपी सहकार्य केले, साथ दिली आणि म्हणूनच अर्धांगिनी हा शब्द त्यांना अगदी पुरेपूर लागू होतो, त्यांना हे दुःख कसे पेलवेल?. सर्वप्रथम प्रार्थना करते की, देव पाठक सरांचे कुटुंब वहिनी, मुली यांना हे दुःख पचवण्याची ताकद देवो ही परमेश्वचरणी प्रार्थना . केवळ त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबाचाच भाग असलेले, पाठक सरांनी न्याय मिळवून दिलेले अनेक पीडित सर्वसामान्य ग्राहक, ग्राहक चळवळीतील त्यांचे कार्यकर्ते या सर्वांनादेखील हे दुःख पेलवण्याची शक्ती देवो.
सुमारे 2000 सालापासून पाठक सरांनी माझा परिचय झाला. ॲडव्होकेट श्री.हिरडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गायकवाड सर आणि पाठक सर यांच्यासोबत सामाजिक काम केल्याने , सामाजिक कामाची आवड निर्माण झाली.
“उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही”, या उक्तीप्रमाणे पाठक सरांनी सामाजिक कामांबरोबर महत्त्वाचा भाग म्हणून ग्राहक चळवळीचा वसा कधीच टाकला नाही. स्वतःची वैयक्तिक कामे बाजूला ठेवून त्यांनी ग्राहक चळवळीला वाहून घेतले होते हे आपणा सर्वांना परिचित आहे. पाठक सर हे तालुका करमाळा , जिल्हा सोलापूर येथील महात्मा गांधी विद्यालय येथे शिक्षक होते.
अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले परंतु त्यांचा परिचय पाठक सर म्हणून कधीच नव्हता, तर त्यांचा परिचय म्हणजे “ग्राहक चळवळीचे पाठक सर “असाच होता. करमाळा तालुका हा सोलापूर, पुणे अहमदनगर इत्यादी जिल्ह्यांच्या सीमेला आहे. प्रत्येक जिल्हा सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटर आहे. ग्राहक न्यायालये ही केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ग्राहक नन्यायालयांबाबतीत करमाळा तालुक्यामध्ये फारसी जागृती नव्हती. परंतु पाठक सरांनी केवळ करमाळा तालुक्यातीलच नव्हे तर इतर अनेक तालुक्यांमधीलदेखील अनेक गोरगरीब व इतर ग्राहकांची प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटाविली आणि ग्राहकांना न्याय मिळवून दिला.
त्यापैकी पत्रकार पोळ यांनी सांगितलेला एका प्रकरणाचा इथे आवर्जून उल्लेखावा वाटतो, “या गावातील एका सर्वसामान्य व्यक्तीला 35000/ रुपयांचे मासिक लाईट बिल आकारले गेले होते. ते बिल भरले नाही म्हणून त्या व्यक्तीची( महावितरणच्या ग्राहकाची) लाईट महावितरण यांच्या लाईटमनने कट केली. त्या व्यक्तीला दोनच पर्याय उरले एक तर अवाजवी आकारलेले रक्कम रुपये 35000/- रुपये लाईट बिल भरणे किंवा अंधारात राहणे.
अशावेळी ती व्यक्ती पत्रकार पोळ यांच्यासोबत पाठक सरांच्याकडे आली आणि पाठक सरांनी त्यांना तुम्ही महावितरणचे ग्राहक कसे आहात आणि तुम्हाला न्याय कसा मिळू शकतो याबाबत समजावून सांगितले . सरांनी स्वतः ग्राहक चळवळीच्या लेटरहेडवर या ग्राहकाच्याबाबत अवाजवी लाईटबिल आकारले गेले आहे, ग्राहकाला योग्य ते बिल आकारून विज जोडणी करावी याबाबत अर्ज तयार करून दिला . तो अर्ज पाहून महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्ड यांच्या अधिकाऱ्यांनी नाइलाजास्तव त्या व्यक्तीच्या घरातील लाईटचा विद्युतपुरवठा जोडणी केली. एवढे एकच उदाहरण नाही तर अशा कितीतरी सर्वसामान्य पीडित ग्राहकांच्या जीवनामध्ये पाठक सरांनी त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे. ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 तसेच ग्राहक संरक्षण अधिनियम 2019 या कायद्यामधील तरतुदींबाबत माहितीस्तव, ‘जागो ग्राहक जागो’ हा नारा देत अनेक कार्यशाळा, शिबिरे घेऊन अनेक खेडेगावातून, शहरातून जनजागृती केलेली आहे. अशा प्रेरणादायी , सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानेच मीदेखील निस्पृहपणे ग्राहकांना न्यायदान करण्याचे काम केले आहे.
आदरणीय स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांनी सुरू केलेले काम ग्राहक चळवळीच्या माध्यमातून पाठक सरांसारखे हाडाचे कार्यकर्त्ये शेवटपर्यंत करत आलेले आहेत आणि म्हणूनच करमाळा तालुक्यातील व करमाळ्याच्या लगत तालुक्यातील अनेक सर्वसामान्य ग्राहकांना विनाखर्च, कमी वेळेत न्याय मिळालेला आहे. खरंतर त्यांच्या कार्याबाबतचे लिखाण पेपर संपला तरी संपणार नाही.
थोडक्यात सांगायचे तर, करमाळा तालुक्यातील ग्राहक चळवळ पोरकी झाली‘ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. सर अनेक वेळा मला , माधुरी परदेशी व इतर काही कार्यकर्त्यांना म्हणायचे की, माझ्यानंतरही ग्राहक चळवळीचे काम अशाच पद्धतीने कायमस्वरूपी चालावे अशी माझी इच्छा आहे.
त्यामुळे मी शेवटी एवढेच म्हणेन , आपल्या परीने आपण सर्वांनी ग्राहक चळवळीचे काम, पाठक सरांच्या कामाची प्रेरणा घेऊन ,तशीच पुढे चालू ठेवावी. हीच खऱ्या अर्थाने पाठक सरांना श्रद्धांजली ठरेल. पाठक सर आणि ग्राहक चळवळ यांचे एवढे नाते की, त्यांचा शेवटचा दिवस म्हणजे, राष्ट्रीय ग्राहक दिन हा होता. ही केवळ योगायोगाची बाब नाही तर परमेश्वराने देखील त्यांना त्यांच्या कार्याची पोहोच पावती दिली. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती, खरंच पाठक सरांच्या कार्याला दोन्ही हात जोडून नमस्कार व सलाम…!
लेखिका – सौ संगीता बाळासाहेब यादव (देशमुख)
माजी सदस्या, जिल्हा तक्रार निवारण आयोग, पुणे. 9424023301
संबंधित लेख – “अभ्यासू व धाडसी व्यक्तिमत्व गमावले”




