सज्जनगडच्या सहलीत करमाळ्यातील विद्यार्थिनीचा मृत्यू

करमाळा(दि. २८): करमाळा येथील श्रावणी राहुल लिमकर (वय १६) या मुलीचा सज्जनगड येथे सहलीदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास घडली. श्रावणीच्या हृदयाला लहानपणापासून छिद्र होते.

यात हकीकत अशी की, श्रावणी ही करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होती. शहरातील एका खासगी क्लासच्या सहलीसाठी, इतर विद्यार्थ्यांसह सज्जनगड परिसरात जाण्याचे ठरले होते. त्यामुळे तिच्या पालकांनी ती सहलीसाठी योग्य नाही असे आधीच बजावले होते. तरीदेखील तिने गड न चढता फक्त कास पठार पाहणार असल्याचे सांगून सहलीला जाण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर पालकांनी तिला परवानगी दिली.

सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर इतरांनी तिला गड चढू नये असे सांगितले. मात्र तिने ते न ऐकता गड चढून वरपर्यंत गेली. आपण हृदयाने कमजोर असून देखील आपण गड चढल्याचा तिला यावेळी आनंद झाला होता. देवदर्शन घेतल्यानंतर तिने वडिलांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधला. “पप्पा, मी गड चढला,” असे देखील तीने सांगितले. त्यानंतर तिला हृदयाचा त्रास सुरु झाला. ती अचानक बेशुद्ध होऊन कोसळली.

शेजारील मित्रांनी तिला आधार देत वाहनतळापर्यंत नेले आणि तातडीने साताऱ्यातील रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
श्रावणीच्या अचानक जाण्याने तिच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिच्या वर्गातील मैत्रिणींना हा मोठा मानसिक धक्का बसला. सोमवारी सकाळी करमाळ्यात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. गजराज तरुण मंडळाचे संचालक राहुल लिमकर यांची ती कन्या होती. या दुर्दैवी घटनेमुळे करमाळा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

