अहोरात्र प्रवाशांसाठी तत्पर राहणाऱ्या चालक-वाहकांचे मुक्कामाची नीट सोय नसल्याने थंडीत हाल -

अहोरात्र प्रवाशांसाठी तत्पर राहणाऱ्या चालक-वाहकांचे मुक्कामाची नीट सोय नसल्याने थंडीत हाल

0

करमाळा: विद्यार्थी, महिलावर्ग, वयोवृद्ध, सर्वसामान्य प्रवासी यांसारख्या रोज शेकडो प्रवाशांना सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचवून सेवा देणारे एसटी बसचे चालक व वाहक मात्र स्वतःच गैरसोयीच्या परिस्थितीत काम करत असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे.

राज्यात थंडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून ग्रामीण भागात तापमानात मोठी घसरण जाणवत आहे. अशा परिस्थितीत गावागावात मुक्काम करणाऱ्या एसटी बसच्या चालक आणि वाहकांना झोपण्याची  व्यवस्थित व्यवस्था नसल्याने त्यांना तीव्र गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

राज्य परिवहन महामंडळ आजही अहोरात्र प्रवाशांना योग्य सुविधा देत आहेत. यासाठी चालक, वाहक हे इमाने-इतबारे काम करतात. एसटी बस ही गावागावात शेवटच्या ठिकाणापर्यंत प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी सोडण्याची सुविधा देत असते. चालक व वाहक हे खेडेगावात शेवटची बस घेऊन जाऊन त्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम करत असतात.

शेवटच्या स्थानकावर रात्रीच्या वस्तीला गेलेल्या चालक व वाहकाला वस्तीच्या ठिकाणी बस सोडून दुसरीकडे जाऊन आराम करण्याची सुविधा मिळत नाही. त्यामुळे चालक व वाहकाला एसटीमध्ये आराम करावा लागतो. एसटी बसमध्ये झोपत असले तरी मच्छरांचा त्रास, थंडी वाजते. अशा परिस्‍थितीत चालक, वाहक यांना रात्र काढावी लागते. स्वच्छतागृह नसल्याने उघड्यावर जावे लागते. अंघोळीची सोय नसते. त्यामुळे कर्मचाऱ्याला ड्युटी संपेपर्यंत तसेच काम करावे लागते.
कडकडणाऱ्या थंड वाऱ्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत असून सेवा देताना ताणतणाव वाढत आहेत.

अनेक गावांमध्ये बस मुक्काम करणाऱ्या ठिकाणी  किंवा मोठ्या शहरात बसस्थानकामध्ये चालक–वाहकांसाठी स्वतंत्र खोली, स्वच्छ शौचालय, बाथरूम आणि सुरक्षित झोपण्याची सोय करण्याची गरज आहे. पण त्याकडे दुर्लक्ष होत असून, या असुविधेकडे एसटी प्रशासन तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

आमच्या मान्यताप्राप्त संघटनेसोबत झालेल्या करारानुसार कर्मचाऱ्यांना गणवेशाचे कापड, पावसाळ्यात गमबूट रेनकोट, छत्री व हिवाळ्यात चालक-वाहकांना वूलन ब्लॅंकेट देणे व कार्यशाळा कर्मचाऱ्यांना गरम जर्सी देण्याची तरतूद आहे. आता सर्वत्र थंडी वाढत असल्‍याने तातडीने वूलन ब्लॅंकेट व जर्सीचे वाटप करण्यात यावे.
संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!