पुरात बळी गेलेल्या शिक्षकाच्या कुटुंबाला मिळाली शासनाची मदत

केम(संजय जाधव)— माढा तालुक्यातील अतिवृष्टीदरम्यान ओढ्यात वाहून जाऊन मयत झालेले प्रभारी मुख्याध्यापक संतोष गाडे यांच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला असून शासनाने चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. ही मदत मिळावी यासाठी शिक्षक भारती संघटनेने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता, त्याला यश मिळाले आहे.

कुर्डूवाडी–माढा रोडवरील ओढ्याला आलेल्या पुरामध्ये प्रभारी मुख्याध्यापक श्री. संतोष मारुती गाडे (जि. प. प्रा. शाळा, भेंड) यांचे दुर्दैवी निधन झाले होते. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर महसूल विभागाच्या रेस्क्यू पथकास त्यांचा मृतदेह सापडला होता.

या घटनेनंतर शिक्षक भारती सोलापूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी मा. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देऊन, गाडे यांना “आपत्ती बळी” म्हणून घोषित करून शासनस्तरीय मदतीची मागणी केली होती. या मागणीस सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर माढा तहसीलदार श्री. भोसले यांनी चार लाख रुपयांच्या शासकीय मदतीची अधिकृत माहिती शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळास दिली.

या निर्णयानंतर श्री. गाडे यांच्या पत्नी, मुलगी, आई व मेहुणे यांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. शिक्षक भारतीच्या प्रयत्नांबद्दल कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी माढा तालुका अध्यक्ष संतोष आटोळे, सचिव सचिन भोंग, करमाळा तालुका उपाध्यक्ष किशोर जाधवर, सचिव सचिन गाडेकर, तसेच देवकर, टोंगळे, कांबळे, हिरवे, बुरुटे व कडवे सर उपस्थित होते.
शिक्षक भारती सोलापूर जिल्हा प्रवक्ता विजयकुमार गुंड यांनी गाडे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन निर्णयाबद्दल तहसीलदार भोसले यांचे संघटनेच्या वतीने आभार मानले.


