कंदर येथील शेतकऱ्यांना मिरजगावच्या सदगुरू कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांचे मार्गदर्शन…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा, प्रतिनिधी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न सदगुरू कृषि महाविद्यालय मिरजगावचे कृषिदूत करमाळा तालुक्यातील कंदर या गावामध्ये दाखल झाले आहेत. ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत दहा आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती हे कृषिदूत देणार आहेत.

याप्रसंगी या कृषिदुतांचे कंदरचे सरपंच मौला मुलाणी, ग्रामसेवक मधुकर माने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, प्रगतशील शेतकरी व गावकऱ्यांनी सहर्ष स्वागत केले. कृषि पदवीच्या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रामीण कृषि जागरूकता’ हा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येतो. या दरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष गावामध्ये सर्वेक्षण करून शेतकऱ्यांचे जीवनमान, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, सामाजिक व आर्थिक स्तर, साक्षरतेचे प्रमाण, नैसर्गिक संसाधने अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. तसेच माती परीक्षण, पाणी परीक्षण, विविध पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन, हवामान सल्ला, कृषि आधारित उद्योजकता, बाजारभाव व आधुनिक तंत्रज्ञान याबद्दल माहिती देणार आहेत.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक डॉ. शंकरराव नेवसे, संस्थेचे सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. चांगदेव माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवम यादव व इतर विशेषज्ञ यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी कृषिदूत प्रणय कदम, श्रेयश गोसावी, विशाल काळे, आशुतोष साळवे, सनत पवार उपस्थित होते.







 
                       
                      