दिव्यांग बालकांच्या सोबत चिमुकल्यांचा भावस्पर्शी राखी उत्सव

करमाळा(दि. ११):धर्मवीर वैद्यकीय मदत कक्षतर्फे चालविण्यात येणाऱ्या लिटिल चॅम्प प्री-स्कूल मधील विद्यार्थिनींनी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने मूकबधिर शाळेतील अनाथ व दिव्यांग बालकांना राखी बांधून स्नेह, प्रेम व बंधुभावाचा धागा अधिक दृढ केला. या उपक्रमामुळे दोन्ही शाळांतील मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटली आणि वातावरण भावनांनी ओथंबून गेले.

या कार्यक्रमासाठी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक काळे, मंदाकिनी नरसिंह चिवटे आणि प्राचार्या असादे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपक्रमाची संकल्पना व प्रेरणा प्राचार्या असादे, शिक्षिका मुसळे, शिक्षिका राठोड व शिक्षिका पाचकवडे यांनी दिली. मूकबधिर शाळेचे शिक्षक व प्राचार्य यांनी या कार्यक्रमाचे स्वागत करून लिटिल चॅम्पच्या बालगोपाळांचे कौतुक केले.

उपक्रमाची संकल्पना प्राचार्या असादे, शिक्षिका मुसळे, शिक्षिका राठोड व शिक्षिका पाचकवडे यांनी दिली. मूकबधिर शाळेचे शिक्षक व प्राचार्य यांनी या कार्यक्रमाचे स्वागत करून लिटिल चॅम्पच्या बालगोपाळांचे कौतुक केले.

प्राचार्या असादे म्हणाल्या, “मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना राखी पौर्णिमेचा सण समजावा आणि त्यांच्या मनात प्रेमाचा संदेश पोहोचावा, हा आमचा उद्देश होता. या बालकांच्या डोळ्यांतील आनंदाचे अश्रू आमच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे.”
या भावस्पर्शी क्षणी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनीही लिटिल चॅम्पच्या विद्यार्थिनींना राख्या बांधून आपुलकी व्यक्त केली. शेवटी गोड मिठाईचे वाटप करून हा स्नेहबंधांचा उत्सव गोड आणि अविस्मरणीय ठरला.


