दुर्गसेवकांनी पेटविलेल्या ज्योतीची मशाल होणार!
करमाळा(संदेश प्रतिनिधी)-: राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी २ कोटी निधी मंजूर झाला आहे. ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपने ऐतिहासिक ठेवा जतवणुक करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर २०२३ मध्ये प्रत्येक रविवारी स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. या मोहिमेमुळे त्यांनी सर्व तालुक्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांनी किल्ल्याच्या संवर्धनासाठी ज्योत पेटविली होती. आता या किल्ल्याच्या संवर्धनासाठी २ कोटी रुपये शासनाकडून मंजूर झाले असल्याने दुर्गसेवकांच्या प्रयत्नांना यश आले असून त्याची आता मशाल होणार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील जनतेकडून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपच्या वतीने ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘दुर्गसेवक करमाळकर’ या ग्रुपने करमाळा भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी विविध मोहीमा आयोजित केल्या होत्या. प्रत्येक रविवारी युवकांनी एकत्र हातात फावडे, कोयता, कुऱ्हाड, पाट्या हातात घेऊन बुरुजावर, तटबंदीवर उगवलेली छोटी-मोठी काटेरी झाडे झुडुपे तोडली. गवतावर औषध फवारणी करण्यात आली. वुडकटर मशिनच्या साहाय्याने बुरुजावर उगवलेली मोठी झाडे तोडली. फावड्याने स्वच्छता केली. किल्ल्या बरोबरच ऐतिहासिक बारव देखील स्वच्छ केली होती. तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले होते.
करमाळा भुईकोट किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून २ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (दि.८ फेब्रुवारी) प्रसारमाध्यमांना दिली.. ही बातमी समजल्यानंतर दुर्गसेवक करमाळकर या ग्रुपच्या सदस्यांसह करमाळा तालुक्यातील जनतेने समाधान व्यक्त केले.
सध्या किल्ल्याची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. या कामासाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे मुख्य दरवाजा, किल्ल्याचे बुरुज दुरुस्ती, तटबंदीचे काम, किल्ल्याबाहेरील परिसर सुशोभीकरण करणे या प्रकारच्या बांधकामाचा सामावेश आहे. किल्ल्याच्या कामासाठी निधीस मंजुरी मिळाली असल्याने लवकरच या कामास सुरुवात करण्यात येईल, तसेच या कामामुळे किल्ल्यास पुर्नवैभव लाभणार असून करमाळा शहाराच्या विकासात आणखीन भर पडण्यास मदत होणार आहे.
- करमाळ्याच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे होणार संवर्धन – शासनाकडून २ कोटी निधी मंजूर
- करमाळा भुईकोट किल्ल्यावरील स्वच्छता मोहिम उत्स्फूर्तपणे संपन्न
- काटेरी झुडुपे तोडत ‘दुर्गसेवक करमाळाकर’ यांची दुसरी स्वच्छता मोहीम संपन्न
संपादन : सुरज हिरडे
Karmala urban Bank | Karmala | Solapur