मांगी परिसरात फिरणारा ‘बिबट्या’च – वनविभागाचा सतर्कतेचा इशारा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : मांगी परिसरात फिरणारा हा बिबट्याचाच असून, मांगी तसेच पोथरे परिसरात वनविभागाच्या पथकाने आज (ता.५) सकाळी पहाणी केली असून, बिबट्याच्या ठस्यांचे निरीक्षण करून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या भागात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून बिबट्या दिसलेल्या परिसरात कॅमेरा बसवणार असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.
करमाळा तालुक्यात बिबट्याचे सत्र सुरूच असून काल (ता.४) सायंकाळी प्रितम माळी यांना मांगी हद्दीतील आंनद बागल यांच्या शेतात बिबट्या दिसला होता, त्यांनी तातडीने त्याचा व्हिडिओ तयार केला व सोशल मिडियावर अपलोड केला, या व्हिडिओमुळे मांगी, पोथरे व परिसरातील नागरीक, शेतकरी यांच्यात घबराट निर्माण झाली आहे, कालपासून अनेकांनी शेतातील काम थांबविले असून, मांगी-पोथरे हद्दीतील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
Video :पुन्हा बिबट्याचे संकट-मांगी शिवारात बिबट्या दिसला
ज्या ठिकाणी बिबट्या दिसला त्याठिकाणी आज (ता.५) सकाळी मोहोळ येथील वनविभागाचे पथक आले होते. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी बाबासाहेब लटके यांनी नागरिकांना योग्य सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. यावर वरिष्ठांना अहवाल दिला जाईल, खबरदारी म्हणून या परिसरात कॅमेरा बसवला जाणार असून, नियंत्रणासाठी काही कर्मचारी ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मांगी येथून पोथरेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या बागल यांच्या उसात काल बिबट्या गेला होता. तसे ठसे आजही दिसले आहेत. वनविभागाचे श्री.लटके व एस.आर.कुर्ले यांनी येथे पहाणी केली. याप्रसंगी पोथरे व मांगी परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. उसामध्ये असलेले ठसे हे बिबट्याचेच असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकार्ते सुजित बागल, युवा सेनेचे आदेश बागल, पोथरे येथील माजी सरपंच सोपान शिंदे, पोलिस पाटील संदीप शिंदे यांच्यासह तलाठी काळे, माजी सरपंच राजेंद्र बागल, अभिमान अवचर, पोलिस पाटील आकाश शिंदे, गणेश ढवळे आदी उपस्थित होते.