जातीचा दाखला काढण्यासाठीच्या जाचक अटी शासनाने रद्द कराव्यात

करमाळा (दि.४) – जातीच्या दाखल्याबाबत शासनाने अनेक जाचक अटी घातल्या असून त्या सर्व रद्द करून सुलभ पद्धतीने जातीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी करमाळा शहर व तालुक्यातील सकल महादेव कोळी समाजाच्यावतीने करमाळा तहसिल कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
या हलगीनाद मोर्चा ची सुरुवात कानाड गल्ली येथील महर्षि वाल्मिकी मिञ मंडळ समाज मंदिर येथुन करण्यात आली व करमाळा शहरातील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २५ सप्टेंबर २०२४ पासून महादेव कोळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सोलापूर येथे समाज बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत. महादेव कोळी समाज हा अनुसुचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट असताना देखील जातीच्या दाखल्याबाबत शासनाने अनेक जाचक अटी घातल्या आहेत. त्या सर्व रद्द करून सुलभ पद्धतीने जातीचे दाखले मिळावेत. तसेच विविध प्रश्नांबाबत हे बांधव प्राणांतिक उपोषण करीत आहेत. तसेच सोलापूर येथे चालू असलेल्या कोळी समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यात आला.
यावेळी सकल महादेव कोळी समाज करमाळा शहर व तालुक्यातील बंधू-भगिनी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.





