कंदर येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न -

कंदर येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

0

कंदर (संदीप कांबळे) : ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या बोधवाक्याचा संदेश देत युवा निर्माण करिअर अकॅडमी, कंदर यांच्या वतीने २९ मार्च २०२६ रोजी ‘युवा रन महोत्सव 2026’ अंतर्गत प्रथमच हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व जयघोषाने करण्यात आला. स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून विविध वयोगटांतील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पुणे, धाराशिव, सोलापूर, माढा, करमाळा, टेंभुर्णी तसेच स्थानिक भागातील १२५ हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

स्पर्धा लहान गट (मुले-मुली), ३० वर्षांखालील व त्यावरील महिला तसेच ३५ वर्षांखालील व त्यावरील पुरुष अशा गटांमध्ये घेण्यात आली. महिला व लहान गटासाठी १० किमी, तर पुरुषांसाठी २१ किमी अंतराची हाफ मॅरेथॉन विशेष आकर्षण ठरली.

  • स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
  • लहान गटात आरव गादीया (प्रथम), शिवरत्न नलवडे (द्वितीय) व विश्वतेज वागज (तृतीय);
  • ३० वर्षांखालील महिलांमध्ये दीक्षा दिवसे (प्रथम), प्रतीक्षा लांडगे (द्वितीय), सनम हवलदार (तृतीय);
  • ३० वर्षांवरील महिलांमध्ये रंजना शेंडकर (प्रथम), ज्योती लोकरे (द्वितीय), रोहिणी वीर (तृतीय);
  • ३५ वर्षांखालील पुरुषांमध्ये अमोल अमोनी (प्रथम), राहुल भगत (द्वितीय), तेजस मंगवडे (तृतीय);
  • तर ३५ वर्षांवरील पुरुषांमध्ये आबासाहेब राऊत (प्रथम), गणेश लोकरे (द्वितीय) व हनुमंत लोकरे (तृतीय) यांनी यश संपादन केले.

स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ५०००, ३००० व २००० रुपयांची बक्षिसे, पदके व विजयचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लहान स्पर्धकांनाही पदके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमास मौलासाहेब मुलानी (सरपंच), नानासाहेब लोकरे (तंटामुक्ती अध्यक्ष), दिलावर शेख, नानासाहेब फरतडे, विजय सरडे, नितीन जाधव, संतोष माने, कांतिलाल रामगुडे, दादासाहेब सरडे, धर्मराज लोकरे, कुमार लोकरे, तुषार वागज, बाळासाहेब बरबडे, धनाजी जाधव (सीएसबी बँक), रोहिणी वीर (प्राथमिक शिक्षिका), प्रशांत रासकर, दत्तात्रय शेंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष गणेश लोकरे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा पार पडल्या. आपल्या भाषणात त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना स्पर्धेमध्ये एकाग्रता व नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेच्या सचिव ज्योती लोकरे यांनीही स्पर्धकांना प्रोत्साहित करत ‘स्वतःवर विश्वास ठेवा’ असा संदेश दिला. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अकॅडमीचे शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!